Tuesday 22 November 2011

मराठी बोधकथा गती करते गतप्राण



        माझ्या एका मैत्रीणीला तिचा वडीलांनी मोटर सायकल घेऊन दिली . ती मोटर सायकल आणि पेढे घेऊन ती माझ्याकडे आली . तिने माझ्या हातावर पेढा दिला . ती नवीन मोटार सायकल दाखविली आणि तिच्या विषयी माहिती देऊ लागली आणि सांगू लागली . या मोटार सायकलला प्रती 100 की. मी . गती देता येते . ती बोलत होती गाडीची माहिती सांगत होती परंतु माझ्या मेंदूचा काटा मात्र तिच्या गती या शब्दावरच अडकुन राहिला होता . आयुष्यामध्ये केवळ गती ही पुरेशी आहे काय ?
        गती असावी , पण ती कोणती गती असावी ? गती या शब्दाचा आपण जर विचार केला तर , आपल्याला प्रगती आणि अधोगती अशा दोन गती दिसुन येतात . प्रगती ही आम्हाला वर नेते . आमची उन्नती करते . आणि अधोगती आम्हाला रसातळाला नेते .  लोक केवळ गतीच्या मागे लागलेले आहे असे दिसून येते . परंतु ज्या गतीच्या मागे आपण लागलेलो आहे .ती प्रगती आहे की अधोगती आहे . याचा मात्र कुणी फारसा विचार करत असल्याचे दिसुन येत नाही .
       मोटार सायकलच्या गतीचा विचार करायचा म्हटले तर खुप गतीने जाणारी माणसं ही कुठेतरी पुढे जातात . त्याच्या अपघात होतो आणि मग देवाघरी जातात . याला गती म्हणायच का ? याला प्रगती म्हणायचं काय ? नंतर त्याच्या आयुष्यामध्ये येणारे कठीण दिवस पाहता अस दिसुन येत की त्यांची ही गती अधोगतीच होती . गतीच्या मागे लागून स्वतःच्या कुटुंबापासुन दुरावणारी माणसं यांनी आयुष्यामध्ये खरोखरच प्रगती साधली काय ? स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी अधिक गती प्राप्त करुन घेण्यांसाठी , स्वतःच्या समाजाचा वापर करणारी माणसं यांनी आयुष्यामध्ये प्रगती साधली काय ? गती महत्वाची परंतु ती कुठली आहे ? प्रगती आहे की , अधोगती आहे याचा खरोखरच विचार करण्याची पाळी आपल्यावर येऊन ठेवली आहे . अन्यथा गती ही आम्हाला कधीही रसातळाला नेईल याचा नेम राहिलेला नाही .


मराठी बोधकथा डोके टेकवणे




       सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मनुष्य हा झाडावर राहायचा . झाडावर त्याचा अधिवास होता .  झोपणे ही झाडावर होते . हळूहळू सुधारणा होत गेली . मानवाला जमिनीवर उतरावे लागले . आणि झाडावरचा मनुष्य जमिनीवर आला. त्यांनी गुहांचा आश्रय घेतला आणि रात्री झोपण्यासाठी तो गुहांमध्ये राहू लागला. कधी तरी या गुहामध्ये झोपणार्‍या सर्वच माणसाला असे जाणवले असेल की, गुहेमध्ये जो उंचावरचा दगड आहे . तिथे जर झोपलो तर जमिनीवर सरपटणारे प्राणी यांच्यापासुन संरक्षण होते. आणि मग उंचावर झोपणाच्या माणसाचा शोध लागला . या शोधातुन कधी तरी माणसाने लाकडाच्या ओडक्यापासुन पलंग सदृष्य वस्तु बनवली आणि त्यावर तो झोपायला लागला . हा पलंग आहे त्या पेक्षा मऊ बनविता येईल काय ?असा विचार करत या मानवाने पलंगाच्या लाकडी चौकटी कायम ठेवल्या आणि मधला पलंग विणुन काढला . या विणुन काढलेल्या पलंगाला आम्ही आज रोजी बाज असे संबोधतो .
         आजकाल शहरामध्ये लोखंडाचे पलंग आलेले आहे . त्यामुळे शहरी लोकांना बाज किंवा खाट हा काय प्रकार आहे याची जाणिव नसावी परंतु खेड्या पाड्यामध्ये अजूनही बाज पाहायला मिळते . खेड्यामध्ये बाज विनणारे काही अनुभवी लोक असतात . हे खास अनुभवी लोकच बाज विणु शकतात .बाज विणल्यावर तिच्यावर ताण यावा व त्यावरुन कोणी पडु नये म्हणुन पाय कसतात . अर्थात खालच्या बाजुला झोपणार्‍या व्यक्तीचे पाये येणार असतात . म्हणुन बाज पायाकडुन कसली जाते .
        लहानपणी खेड्यात माझ्या घरी बाज होती . त्या बाजेवर खेळतांना मला मजा वाटायची, मी त्यावर कधी उड्या मारायची . कधी डोक्याच्या आधारे उड्या मारायची आणि एक दिवस अचानक माझे डोके बाजेवर असणार्‍या लाकडाच्या माथ्यावर आदळले . त्या बाजेच्या माथ्याला ठावा असे म्हणतात . ठाव्यावर डोके आदळल्यानंतर डोक्याला चांगल टेगूंळ आलं आणि डोकं धरुन मी बसले . मी दोरीवर आपल डोकं टेकवत आहे असा विश्वास मनात ठेवून डोक ठेवल्यामुळे आणि ते चुकीच्या जागी टेकवल्यामुळे डोक्याला मार लागला होता . त्यामुळे पश्चातापाची पाळी  माझ्यावर आली होती .
        आज ह्या घटनेकडे विचार करतांना डोक्यामध्ये विचार येतो की , बाजेवर चुकीच्या ठिकाणी डोके ठेवले तर डोक्याला मार लागतो  व आपल्या वर पश्चातापाची पाळी येते . परंतु प्रत्यक्ष आयुष्य जगत असताना अनेकदा चुकीच्या ठिकाणी आम्ही डोके टेकवतो . चुकीच्या ठिकाणी डोके टेकवले आहे ही बाब लक्षात यायला तसा उशीरच होतो आणि जेव्हा लक्षात येते तेव्हा आमच्यावर पश्चातापाची पाळी आलेली अस्ते . आयुष्य जगत असतांना देवा धर्माच्या नावाखाली आम्ही बाबा बुवा याच्या पायावर डोक टेकवत जातो आणि हे लबाड बुवा आमचे शोषण करत जातात . जेव्हा आमच्या लक्षात येते की , आम्ही चुकीच्या ठिकाणी डोके टेकवीत आहोत तेव्हा बराच उशीर झालेला असतो . त्यामुळे या पुढे डोकं टेकवत असताना जरा सावध !  

मराठी बोधकथा स्नेहाचा धागा तोडु नका




      संध्याकाळची वेळ होती . अचानक आभाळ दातुन आले आणि जोरदार वारा वाहायला लागला . पाऊस देखील पडायला लागला . त्या जोरदार सुसाट वार्‍यामुळे विज कनेक्शन तुटून पडलं . लाईट येण्याची मुळीच शक्यता नव्हती . आजुबाजूला सगळ्यांकडे दिवे पणत्या मेणबत्या जळत होत्या . आमच्या घरी सुध्दा दिवे जळत होते . पण ते इनव्हरर्टवर जळत होते . आता ते इनव्हर्टर काही कालावधी नंतर ट्रीप होऊन बंद पडणार होते आणि घरभर अंधार होणार होता . मग माझे पती म्हणाले , अग ! तो हॉल मधला लाईट बंद कर . बेडरुम मधील छोटा लाईट  लाव . टी . व्ही देखिल बंद कर . मी बंद केले . जवळजवळ सर्व मोठे लाईट बंद करुन आणि छोटा लाईट लाऊन आम्ही अंगणामध्ये येऊन बसलो. अंगणामध्ये स्ट्रीट लाईटचा प्रकाश पडला होता . कधी नव्हे ती विजेची बचत करत होतो .
      मनामध्ये विचार आला की , शासन  एवढे ओरडू ओरडू सांगते की , विजेची बचत करा , विजेची बचत करा ! तेव्हा मात्र कुणालाच रस वाटत नाही . परंतु आज जेव्हा रात्रभर लाईट येणार नाही आहे याची आम्हाला स्पष्ट जाणीव झाली, तेव्हा आम्हाला कुणीही सांगीतले नसतांना आम्ही विजेची बचत करतोय आणि ती ही थोडी थोड्की नव्हे तर घरामधले सर्व लाईट बंद करुन . तो पर्यंत जो पर्यंत गप्पा मारायच्या आहेत किंवा झोपण्याची वेळ व्हायची आहे . त्या वेळेपर्यंत अंगणामध्ये स्ट्रीट लाईटच्या प्रकाशामध्ये येऊन बसलो आहोत .
     पुन्हा माझ्या डोक्यामध्ये विचार आला की , असे का व्हावे ? याच कारण म्हणजे जेव्हा एखादी वस्तू मुबलक असते तेव्हा तिची आपल्याला किंमत वाटत नसते , परंतु आता विज ही मर्यादीत आहे . इनव्हरर्टच्या बॅटरीमध्ये विज साठविलेली आहे . तेवढी विज पुरवायची असेच आहे . याची आम्हाला जाणीव झाली आणि म्हणुनच तिची आम्हाला किंमत वाटते . पाण्याचेही असेच आहे , एरवी खुप सारे पाणी वाह्त अस्ते परंतु जेव्हा आपल्याला माहित होतं की दोन दिवस नळ येणार नाहीच . तेव्हा मात्र पाण्याच्या थेंबा थेंबाचा हिशेब आम्ही ठेवतो .
      आयुष्यामध्ये प्रेमाचे तरी काय वेगळे आहे ? जेव्हा प्रेमाचा अमर्यात वर्षाव होतो तेव्हाच आम्हाला त्या प्रेमाची किंमत कळत नसते . परंतु प्रेमाचा वर्षाव करणारी व्यक्ती जेव्हा दूर जाते तेव्हा मात्र त्या व्यक्तीकडून मिळणार्‍या प्रेमाची खरी किंमत कळायला लागते . कारण तेव्हा तिच्याकडून मिळणारे प्रेम बंद झालेल असते . ती व्यक्ती दूर गेलेली असते . आयुष्यामध्ये जर प्रेम टिकुन ठेवायचे असेल , तर वेळीच त्याची किंमत ओळखली पाहीजे . त्याला योग्य तो आदर सन्मान द्यायला शिकल पाहिजे . अन्यथा तो प्रेमाचा स्त्रोत कधी दुर होईल ? कधी दुअरावेल ? हे सांगता येत नाही . विजेचे तुटलेले कनेक्शन जोडता येईल. खंडीत झालेला विजपुरवठा पुर्ववत सुरु होईल . परंतु प्रेमाचा  स्त्रोत जर खंडीत झाला किंवा दुरावला, तर तो जोडणे कठीणच . हे विचारात घेवूनच  एका सुफी संताने कदाचीत खालील ओळी रचल्या असाव्यात .

रहिमन धागा प्रेमका , मत तोडो चटकाय !
टुटे पर ना जुडे , जुडे तो गाठ पड जाय !!

मराठी बोधकथा संयम



      आमच्या लहानपणी खेळणी फारशी उपलब्ध नव्हती . मग जे मिळालं त्या आधारे खेळायचो . नदीवरुन माती घेऊन यायचो . ती भिजवायचो आणि मग त्या मातीचे बैल बनवायचो , कधी कधी गणपतीही बनवायचो , कधी कधी तिच माती घ्यायची आणि त्याच मातीचा गणपती बनवायचा . सारे मुलं मुली मिळुन हा खेळ आम्ही खेळायचो . आता मात्र जग बदललेले आहे . बाजारामध्ये छान छान अशा स्वरुपाचे खेळ विकायला आलेले आहे .
       नुकतेच मी नागपुरला गेले होते . खेळोण्याच्या दुकानात गेले . माझ्या छोट्या मुलीसाठी मी प्लास्टर ऑफ़ पॅरीस पासुन बनलेला प्राणी बनवण्याचा खेळ विकत घेवून आले . त्या खेळामध्ये प्लास्टीकचे साचे असतात आणि त्या साच्यामध्ये प्लास्टर ऑफ़ पॅरीस ओतायच आणि मग त्याचा बैलाचा आकार असेल , तर बैलाची मुर्ती तयार होते . मग जर का तो घोड्याच्या आकाराचा असेल, तर घोड्याची मुर्ती तयार होते . मुलांना हा खेळ खुप आवडतो आणि मग आम्ही घरी हा खेळ आणल्यावर प्लास्टर ऑफ़ पॅरीस भिजवलं द्रावण तयार केलं आणि ते त्या साच्यामध्ये टाकलं आत साच्यामधुन प्राणी बाहेर पडल्यावर नेमका कसा दिसतो . याची उत्सुकता माझ्या लहानशा मुलीला लागलेली आणि ती सारखा आग्रह धरु लागली . आई ! आत मधली मुर्ती काढुन बघ ना !    आई ! आत मधली मुर्ती काढुन बघ ना ! आणि मग तिच्या आग्रहास्तव मला तो साचा हाती घ्यावा लागला .वस्तुतः त्या खेळावर दिलेल्या सुचनेनुसार किमान अर्धा तास तरी द्यायचा होता . म्हणजे साच्यामधलं ते द्रवण घट होणार होतं . परंतु जवळ जवळ दहा मिनिट कमी असतांना आम्ही साच्यामधला तो प्राणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये तो प्राणी तुटला . आम्हा दोघांचेही मन खट्टू झालं
       दुसरं असा प्रसंग मला आठवतो  की , काही दिवसापुर्वी माझ्या हातात थोडं खरचतलं रक्त बाहेर आलं आणि त्यावर मी मलम लावलं . एक दोन दिवसांनी ती जखम बरी झाली त्यावर एक काळ्या रंगाची खिपली चढली आणि ती मला सारखी खटकत होती .म्हणुन हाताच्या नखाने मी ती खिपली काढ्ण्याचा प्रयत्न केला परंतु जखम पुर्णपणे सुखली नव्हती आणि खिपली काढताच आतील रक्त पुंन्हा वाहायला लागलं . पुन्हा तिन चार दिवस ती जखम बसायला लागले आणि या वेळी मात्र खिपली आपोआप गळून पडण्याची वाट पाहावी लागली .
      त्या दोन्ही उदाहरणाकडे विश्लेषक नजरेने पाहत असतांना मला एक अणि एकच तत्व दिसतो . ते म्हणजे आयुष्यामध्ये संयम अतिशय महत्त्वाचा आहे. संयम बाळगला नाही आणि उतावीळपणे कृती केली तर पश्चाताप मनुष्याच्या वाटेला येतो . साच्यामध्ये टाकलेला प्लास्टर ऑफ़ पॅरीस जर पुर्ण वेळ राहु दिलं नाही , ते वाळू दिलं नाही , आणि लगेच बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तर प्राण्यांची मुर्ती सलग रुपात बाहेर न निघता तुटक किंवा फुटक्या रुपात बाहेर पडते . हाताला जखम झालेली त्यावरची खिपली जर पक्क न होऊ देता आम्ही काढण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा जखमच वाट्याला येते .
      या दोन्ही उदाहरणावरुन मला एवढाच बोध घ्यावासा वाटतो की, आयुष्य जगत असतांना संयम महत्वाचा हे लक्षात ठेवावं आणि संयम पाळत जगावं जेणे करुन अवेळी खिपली काढुन भळा भळा रक्त तुमच्या वाट्याला येणार नाही .


मराठी बोधकथा कष्टाची किंमत



 
         शेती मला खुप आवडते . पावसाळा पडला शेतामध्ये होणारी ती पेरणी त्या तिफणमागे चालणार्‍या बाया , निंदन करतांना म्हटल्या जाणारी ती गाणी , शेतामध्ये बहरलेल आणि डोलणारं हिरवगार पिक , कणसामध्ये भरलेली दाणे आणि ती दाणे टिपुन घेण्यासाठी आलेले पक्षी , पक्ष्यांचा चिवचिवाट , पक्षी हाकलुन लावण्यासाठी शेतात लावलेले बूजगावणे या सर्व गोष्टी मनामध्ये पक्के घर करुन राहीलेले आहेत . धाण्याची कापणी आणि मग घरी भरुन आणलेली पोती , ते सर्व मन मोहरुन टाकणारं वाटतं . आता शेताशी फारसा संबंध येत नसला तरी , माझे आजोबा शेती करायचे . लहाणपणी आजोबाकडे गेलो की , शेतामध्ये जायची . आमचा हट्ट ठरलेला असायचा मग आम्ही सर्व बहिण भाऊ आजोबांच्या बैलगाडीमध्ये बसुन शेतामध्ये जायचो .
        एकदा असाच हट्ट धरुन आजोबा सोबत शेतामध्ये जायला निघालो . जरा सकाळी लवकरच निघालो होतो . आजोबांनी बैलगाडीला बैल जोतले . आम्ही बैलगाडी मध्ये बसलो . आजोबा बैलगाडी हाकलु लागले आणि बैलगाडी शेताच्या दिशेने धावू लागली . बैलगाडीच्या मागे मागे घरचा मोती कुत्रा देखील धावू लागला . आम्ही शेतामध्ये पोहचलो . बैलांनी ती बैलगाडी खेचुन शेतापर्यंत आणली होती आणि आजोबा सतत बैलानी चालाव म्हणुन त्यांना तुतारी टोचत होते .
       एकदाची बैलगाडी शेतामध्ये येवून पोहचली . आजोबांनी बैलगाडीचे बैल सोडले . थोडावेळ आम्ही शेतामध्ये बसलो . मुंगाच्या शेंगा तोडल्या . थोड्या भुईमुंगाच्या शेंगाही उपटून सोबत घेतल्या . मग शेतामध्ये कापून ठेवलेले गवताचे भारे आजोबांनी बैलासमोर ठेवले . बैलानी गवत आणि बैलागाडीत सोबत आणलेला थोडा कडबा खाल्ला . आम्ही सोबत शिदोरी आणली होती . आम्ही शिदोरी खाल्ली . मोती कुत्र्याला भाकर देण्यात आली . शेतामधील धाण्याची पोती आजोबांनी गाडी मध्ये टाकली आणि तोवर दुपार झालेली होती . आम्ही घराकडे परत येवू लागलो . उन्ह जरा जास्तच होत उन्हा तान्हामध्ये ते बैल आमचं आणि त्या पोत्याच वजन घेवुन धावत होते . आजोबा त्यांना हाकलत होते . आणि मोती कुत्र्याकडे बघीतले , तर बैलगाडीच्या खालून मोती कुत्रा चालात होता .
       हे सगळं दृष्य , हा सर्व घटनाक्रम आठवतांना वाटतं की , बैल आकाराने मोठा असतो . कष्टाळू असतो . परंतु त्याच्या वाट्याला काय तर ओझे आणि भार ! आणि त्या मध्ये कसुर केला तर मार ठेवलेला आणि ऐवढ करुन त्याला खायला काय तर गवत आणि कडबा . याच्या विरुध्द मोती कुत्रा काय करत होता ? तर गाडीच्या माग माग चालत होता . उन्ह वाढले म्हणुन बैलगाडीच्या सावलीत चालत होता आणि त्याला मात्र ज्वारी पासुन बनलेली भाकरी !
     वस्तुतः ज्वारी पिकवण्यामध्ये कुत्र्याचा कुठलाही वाटा नव्हता . खरा वाटा तर बैलाचा होता परंतु बैलाच्या वाट्याला आला होता तो कडबा आणि मोत्यानं काहीच केलं नव्हतं तरी त्याच्या वाट्याला आली त्या ज्वारी पासुन बनलेली भाकरी !
     मला असं वाटत की , आमची व्यवस्था ही असीच ! की , जो राबतो त्याच्या वाट्याला निकृष्ट जीवन . अगदी बैलासारखं ! आणि जो राबत नाही त्याला मोत्यासारखं जीवन ! मोत्यानं कार्यालयाच्या सावलीमध्ये बसुन काम करावे . सर्व सुख त्याच्या वाट्याला आणि अन्नदाता मात्र बैलासारखा शेतामध्ये राबणार .   याला न्याय म्हणावे काय ?          

Thursday 3 November 2011

मराठी बोधकथा फुलणे



    
मनुष्य विविध कारणांनी झाडांची जोपासना करतो . त्यापैकी सावली मिळावी , शुध्द हवा मिळावी , फळे मिळावे, जमिनीची धुप थांबावी , पाने मिळावी , लाकुड मिळावे, फुले मिळावी इ. प्रमुख हेतू म्हणता येतील .
      फुलझाडे ही काही मोठी वाढणारी , तर काही लहान आकाराची लहान फुलझाडे कुंडीत वाढवता येतात आणि आयुष्यभर कुंडीतच राहतात . मोठ्या आकाराची फुलझाडे ही आधी कुंडीमध्ये वाढतात , पुढे त्यांचा आकार वाढतच जातो . सरतेशेवटी कुंडीला तडे जावू लागतात , फुटते आणि फुलझाडे जमिनित लावावे लागते . सुखंटाने कोष फोडावा तसे फुलझाड कुंडी तोडते .
     
      फुलझाडे केवळ बागेतच वाढतात असे नव्हे तर जंगलात देखील वाढतात .काटे कोरांटा , झोनिया इ . फुलझाडे जंगलात दरवर्षी नित्यनेमाने उगवतात . कोणाला त्यांचे बी पेरावे लागत नाही , खत पण टाकावे लागत नाही . पावसाळा आला की , ही फुलझाडे उगवतात, फुलतात .
       आतापर्यंत मी विविध प्रकारची फुले पाहीली आहेत . त्यापैकी कित्येक नर्सरीमधुन विकत आणलेली होती,  तर कित्येक जंगलात वाढलेली होती काही महागडी तर काही स्वस्त होती . या सर्वांमध्ये मला एक गुण आढळला तो म्हणजे सुंदरता .
       ही सर्वच फुले सुंदर असल्याचे प्रत्येकाला दिसून येईल . कुरुप फुल शोधूनही सापडणार नाही . मग त्याला एकदाचा गंध कसा का असेना ! फुले कुरुप नसतात कारण फुलण्याची कला त्यांची अवगत केलेली आहे . फुलण्याची कला अवगत असलेले जगात काहीही कुरुप असु शकत नाही . मग त्याचा रंग कसाही असो , रुप कसेही असो  ! मग फुल असो की मनुष्य असो !
       फुलतांना केवळ बाह्य रुपाने फुलता येते असे नाही . खरे तर आतुन फुलणे अधिक महत्त्वाचे . आतून फुललेली व्यक्ती रुपाने , रंगाने कशीही असली तरी आकर्षक वाटणारच !


Wednesday 2 November 2011

मराठी बोधकथा गर्दी



   
         निवडणुका , नेते , आणि सभा हे अतुट समिकरण आहे . निवडणुका जवळ आल्या की प्रचाराची रणधुमाली सुरु होते . गल्लोगल्ली , खांबा खांबावर बॅनर , पोस्टर झळकु लागतात . भोंगे लावलेल्या गाड्या फिरु लागतात .
      
          निवडणूकीच्या प्रचाराच्या साधनामधील अत्यंत महत्वाचे साधन म्हणजे प्रचारसभा ! मतदार संघात मोठमोठ्या नेत्यांच्या प्रचारसभा पार पडल्या व या सभांना लाखोंच्या संख्येने लोक गोळा झाले की, विजय निश्चित झाला असे समजले जाते . सभेसाठी येणारा नेता जर लहान असेल तर हेलीकॉप्टरने येतो बर्‍याचदा जमलेली गर्दी हे नेत्यांचे भाषण ऐकण्यासाठी नव्हं तर उतरणारे आणि उडणारे हेलीकॉप्टर पाहण्यासाठी जमलेली असते .
      मोठ्या नेत्यांच्या सभेला मोठी गर्दी जमावी म्हणुन गावच्या स्थानिक नेत्यांना निरोप पाडले जातात . त्यांना ठराविक कार्यकर्ते आणण्याचे उद्दिष्ट दिले जाते. मग गावोगावचे हे स्थानिक नेते कार्यकर्ते गोळा करतात. आणि झेंडे लावलेल्या वाहनातून त्यांना सभास्थळी घेवून येतात. मुद्दाम आणलेल्या या लोकांची चहा पानाची , नास्त्याची व्यवस्था करावी लागते . प्रसंगी दिवसभराच्या मजुरीचे पैसे ही द्यावे लागतात . गर्दी जमविण्यासाठी किती हा खटाटीप ? आणि जमून जमून जमतात ती फक्त काही हजार माणसे !
      आषाडी, कार्तीकीला विठ्ठ्लाकडेही लोक जमतात .पण त्यांना कुणी सभेला जमण्याची सूचना दिलेली नसते . गाडी पाठविलेली नसते . चहापाणी आणि वाहनांची सोय केलेली नसते . मिळेल ते वाहन पकडून, प्रसंगी पायी चालत जावून भाविक पंढरीला पोहचतात . यामागची एकमेव प्रेरणा म्हणजे श्रद्धा   ! विठ्ठलावर ज्याप्रमाणे भाविकांची श्रद्धा आहे , तशी मतदाराची श्रद्धा नेत्यावर निर्माण झाली तर मग सभेला आपोआप गर्दी जमू लागते . शेवटी सारा श्रद्धचा खेळ !


Wednesday 19 October 2011

मराठी बोधकथा उपयुक्तता


      मानवाने आपल्या प्रगतीसाठी, मनोरंजनासाठी आजुबाजुच्या पशू पक्षांचा, झाडा वेलींचा उपयोग करुन घेतला आहे . मानवांने ज्याचा उपयोग करुन घेतला त्या सर्वांमधील समान गुण म्हणजे उपयुक्तता . परंतु मला प्रश्न पडतो तो वेगळाच !  उपयुक्तता ही स्वतःच स्वतःची शत्रु आहे काय ?
       गाय गोड दुध देते . गायीचे दुध पौष्टीक असते . म्हणुन तिला बांधुन ठेवतात . कोंडवाड्यात कोंडावे तसे गोठ्यात दररोज कोंडतात . बैलाच्या अंगी शक्ती आहे . तो गाडी, औत खेचू शकतो. पण तो काबूत राहीला पाहीजे म्हणुन त्याचे खच्चीकरण आणि नाकात वेसण ! घोडा वेगाने पळतो . त्याच्या पाठीवर बसुन माणसाला जलद गतीने प्रवास करता येतो . म्हणुन घोड्याकरिता लगाम . आणि जोरदार पळावे म्हणुन चाबकाचे  फटके . हत्तीच्या ताकदीचा वापर करता यावा व हत्ती काबुत राहावा म्हणुन त्याच्या पायी साखळदंड आणि अंकुशाचा मार . पोपट दिसायला सुंदर , मधुर बोलणारा म्हणुन त्याच्या वाट्याला पिंजर्‍यातील बंदिस्त जिवन . आम्ही वाझोट्या झाडाला दगड मारत नाहीत . तर त्याच झाडाला दगडाचा मार सहन करावा लागतो , ज्याला फळे लागलेली आहेत , उपयुक्तता ही स्वतःच स्वतःची शत्रु आहे काय ?
        कोणत्याही संघटनेत , कंपनीमध्ये , कार्यालयात कामसू आणि कामचोर असे कर्मचारी असतात. त्यापैकी कामचोर काम करणार  नाही म्हणुन साहेब त्यांला काम सांगत नाही . काम करणार्‍यावर दिवसेंदिवस कामाचे ओझे वाढत जाते .
        ऑफिसमधील कर्मचार्‍यांना सुटी पाहीजे असते . कामचोराला पटकन सुटी मिळते . कारण तो गेल्यामुळे साहेबांचे काहीच अडणार नसते पण काम करणारा कर्मचारी रजेवर गेला तर काम कसे होईल ? म्हणुन काम करणार्‍याला सहसा रजा मिळत नाही .
उपयुक्तता ही स्वतःच स्वतःची शत्रु आहे काय ?

मराठी बोधकथा प्लास्टिकची फुले



  
     ग्रंथालयाचे अनेक फायदे आहेत . वाचकांना अत्यल्प मोबदला मोजुन ग्रंथ वाचायला मिळतात . एवढ्या विविध प्रकारचे ग्रंथ खरेदी करणे कोणत्या एका व्यक्तीच्या आवाक्यातील नसते आणि समजा एखाद्याने प्रत्येक ग्रंथ स्वतः खरेदी करुन वाचायचे म्हटले तरी एकदा वाचून झालेल्या ग्रंथाचे पुढे काय करायचे ? ते व्यवस्थेत कोथे ठेवायचे . असे प्रश्न निर्माण होतातच .
     
    ग्रंथालयाला इंग्रजीमध्ये आम्ही लायब्ररी म्हणतो पण लायब्ररी ही फक्त पुस्तकांचीच असू शकते काय ? माझ्या ओळखीत असा एक मुलगा आहे जो पोस्टर लायब्ररी चालवतो म्हणजे भिंतीवर आम्ही विविध देखावे लावतो . तेच ते देखावे बघून बघून अगदी डोळे विटून जातात . नवीन काहीतरी भिंतीवर लावावेसे वाटते पण जुन्यांनी  आधीच जागा व्यापुन टाकलेली असते . शिवाय नविन देखावे पोस्टर आणल्यावर जुने कोठे ठेवायचे ? असा प्रश्न पड्तो  . पोस्टर लायब्ररी चालविणारा हा मुलगा महिण्यातुन एकदा वर्गणीदाराच्या घरी जातो आणि भिंतीवरचा जूना देखावा काढुन नविन देखावा लावून जातो . त्याच्याकडे असे अंनेक देखावे आहेत आणि ते तो फिरत्या क्रमाने वर्गणीदारांच्या घरी लावत असतो .  लोकांना देखील अल्प मोबदल्यात नवनवीन देखण्यांचा आस्वाद घ्यायला मिळ्तो .

       नुकताच अशा एक युवकाशी माझा परिचय झाला , तो फुलांची लायब्ररी चालवतो . हा मुलगा आठवड्यातुन एकदा वर्गणीदारांचा घरी जातो आणि त्याच्या फुलदाणीमधील फुलांचे जुने गुच्छ काढुन नविन लावून देतो कागदाची आणि प्लास्टीकची ही फुले अशा पध्दतीने घरोघरी फिरत राहतात . लोकांनाही अल्प मोबदल्यामध्ये नवनवीन पुष्परचनेचा आस्वाद घ्यायला मिळतो . नाहीतर ऐरवी धुळ बसुन काळपट पदलेली फुले फुलदाणीत घाण मांडुन बसलेली असतात .
       एकदा असाच हा मुलगा आला त्याने फुलदाणीतील फुले बदलली आणि निघुन गेला. त्या मुलाने लावलेल्या फुलांचे मी निरीक्षण करु लागली . प्लास्टिकची ती फुले टवटवीत दिसत होती . पण प्लास्टिकची असल्यामुळे त्यांना कोणताही सुगंध नव्हता . ही प्लास्टिकची फुले  मला तोंडावर खोटे खोटे हास्य आणणार्‍या व्यवहारी माणसारखी वाट्ली . प्लास्टिकची फुलांसारखी ही माणसे वरवर प्रसन्नवदन दिसत असतात परंतु प्लास्टिकची फुलांत जसा कोणताही सुगंध नसतो, तसा या माणसांच्या वागण्यात कोणताही प्रेमभाव नसतो . असतो तो फक्त व्यवहार !
 

Tuesday 18 October 2011

मराठी बोधकथा घर पाहावे बांधून !



       घर पाहावे बांधून , लग्न पाहावे करुन अशी एक म्हण आहे . माणसांची ही म्हण कदाचीत पक्षांतही असावी . कारण पक्षी आपला जोडीदार निवडतात, संसार थाटतात, घर ही बांधतात , पिलांना जन्म देतात आणि संगोपनही करतात .
      माणसांच्या घर बांधण्याच्या तर्‍हा निरनिराळ्या आहेत . काही घरे शेणा मातीची, कुडाची , सारवलेली . काही दगडमातीची , कौलारु छ्प्पर असलेली . तर काहीवर टिनपत्र्याचे छप्पर . काही घरे पक्की विटा सिंमेंटाने बांधलेली आणि वर स्लॅब घातलेली . एका खोलीपासून ते शेकडो खोल्या असणारी माणसांची घरे आहेत . एक दिवस एका खोलीत राहायचे म्हटले तरी वर्षभर पुरतील एवढ्या खोल्या असणारी अवाढ्य घरे माणसांनी बांधून ठेवलेली आहेत .
       माणसांच्या घरबांधणीमध्ये गरजेला कमी महत्त्व असून, ऐपतीला जास्त महत्त्व आहे. ज्याची जेवढी मोठी ऎपत , जेवढा अधिक खर्च करण्याची तयारी , त्याने तेवढे मोठे घर बांधावे . पक्षी मात्र गरजेपेक्षा मोठे घर बांधत नाहीत . पक्षांमध्ये गरीब चिमणी श्रीमंत चिमणी असा भेद नाही . सर्व चिमण्यांची घरे सारखीच गरजेनुसार बांधलेली . उगीचच आहेत म्हणुन चिमणी अवाढ्य घर बांधत नाही .
      मुळामध्ये पक्षी स्वतःसाठी घर बांधत नाही . पक्षी घर बांधतात . आपल्या पिल्लासाठी . पिल्ले लहान असेपर्यंत घरट्यात राहतात . एकदा मोठी झाली की, आई वडिलांचे घरटे सोडून स्वतंत्र राहतात. आईवडीलांनी बांधलेली घराचा मोह त्यांना होत नाही.
       आम्ही माणसे घर बांधतो . ती स्वतःसाठी व मुलांसाठी बांधतो मुले मोठी होतात. आपल्या पायावर उभी राहतात . पण वडिलोपार्जित घराचा मोह मुलांना सुटत नाही . आई वडिलांकडे ते घरात हिस्सा मागतात . प्रसंगी डोके फ़ोडण्यापर्यंत मजल जाते . वडिलोपार्जित घरासाठी भांडणार्‍या या मुलांनी पक्षांपासुन काहीतरी धडा घ्यावा .

Monday 17 October 2011

मराठी बोधकथा - गती



        संस्कृतमध्ये जगाला      जगत असे म्हटले आहे .  जगत या शब्दाचा अर्थ ,   जेथे सर्व काही गतिमान आहे आणि ते शब्दशः खरे ही आहे. म्हणुनच हे जग आहे गतिशिलता हा या विश्वाचा मुलभूत नियम  आहे . या विश्वात आपल्याला सर्वत्र गतिमानता पाहायला , अनुभवायला मिळते .
     विश्वामधील आकाशगंगा या गतीमान असुन त्या एक दुसर्‍यापासुन दुर दुर जात असल्याचे हबल दुर्बिनीद्वारे केलेल्या निरिक्षणातुन स्पष्ट झाले आहे. काही आकाशगंगा या सर्पीलाकार असुन त्या स्वतःभोवती फिरत आहेत .
      आकाशगंगामध्ये तारे फिरत आहेत . तार्‍यांना आपले ग्रहमंडळ असते . हे ग्रह त्या तार्‍यांभोवती फिरत आहेत . ग्रहांना उपग्रह आहेत . उपग्रह हे ग्रहाभोवती फिरत आहे.
     विश्वातील प्रत्येक पदार्थ हा अणूंपासुन बनविला आहे. या अणुंमध्येही गतीशिलता प्रत्ययास येते .अणूच्या केंद्राकामध्ये असणार्‍या प्रोट्रोन आणि न्युट्रोन भोवती इलेक्ट्रोन प्रकाशाचा वेगाने फिरत आहे .
    पिंडी पासुन ब्रम्हाडापासुन सर्वत्र गतीशिलता आहे आणि ही गतीशिलता आहे. म्हणुनच जीवनाचे अस्तित्व आहे .
      पण माणुस मात्र वेगळ्या दिशेने वाटचाल करतोय . त्याने वाहनांचा शोध लावला आणि स्वतःचालणे थांबविले . यंत्राची व वाहनाची गती वाढली , माणसाची मात्र खुंटली कामाच्या नावाखाली माणसे एकाच जागी खुर्चीत तासनतास बसुन राहतात . गती हे जीवनाचे , तर स्थिरता हे मृत्युचे लक्षण . माणसाची ही गतीहिनता त्याला अनेक व्याधी जडण्यास कारणीभूत ठरते . कामाच्या नावाखाली एकाच जागी स्थिरावलेल्या माणसाला खुर्चिचे अनेक रोग जडतात .
      या रोगांपासून मुक्तता मिळवावयाची असेल , तर विश्वाचा मुळाशी असणारा गतीशिलतेचा नियम माणसांनी पाळला पाहिजे. निदान सकाळ संध्याकाळ तरी काही वेळ पायी फिरले पाहिजे . अन्यथा गतिहिनता विनाशाकडे नेल्याशिवाय राहणार नाही .  

Saturday 15 October 2011

मराठी बोधकथा अति सर्वत्र विवर्जयेतः



      बदली झाली की गाव सोडावे लागते . घर बदलते . आजूबाजूचे लोकही बदलतात. तरीही आधीच्या गावची काही माणसे या ना त्या कारणामुळे आठवणीत राहतात . काही जाणीवपुर्वक संपर्कात राहतात.
      पुर्वीच्या काळी दुरवरच्या माणसाशी संवाद साधायचा म्हणजे कठीणच बाब होती . संदेशवहनाची साधणे तितकीशी विकसित झालेली नव्हती . मग एखादा मनुष्य काही कामानिमित्य दुसर्‍या गावाला जायचा . तो ज्या गावी जात असे , त्या गावात जर काही नातलग राहात असतील , तर पहिल्या गावातील माणसे अशा जाणार्‍याबरोबर निरोप द्यायची मग असा प्रवासाला निघालेला व्यक्ती सवड काढुन त्या गावकर्‍यांच्या नातलगाकडे जायचा आणि निरोप सांगायचा .
     टपालखात्याचा विकास झाला . एका गावातल्या माणसाचा संदेश दुसर्‍या गावात टपाल खाते पोहचवू लागले . पत्रलेखन ही एक कला बनली . अर्थात पत्र लिहून देणे आणि वाचुन दाखविणे या माध्यमातून पत्राची भाषा निरक्षरांनाही उमगू लागली .
     आता टेलीफोन आणी मोबाईलचे युग आहे, त्यामुळे पत्र विशेष या गोष्टी मागे पडल्या आहेत . मोबाईलवरुन एसएमएस करणे सहजसुलभ झाले आहे आणि रिक्षावाला , मोलकरीण सर्वांकडे मोबाईल पोहोचला आहे .
     माझी एक मैत्रीण मला दररोज एसएमएस करते . उत्तरादाखल मलाही तिला एसएमएस करावा लागतो . बर्‍याचदा या एसएमएस मध्ये थोरमोठ्यांचे विचार असतात .
     एसएमएस वर होणारा खर्च वाचविण्यासाठी मी वेबसाईटवरुन संदेश पाठवू लागले . दररोज संगणकावर बसणे शक्य नसल्यामुळे आठवड्यातुन एकदाच संगणकावर बसुन मैत्रीणीला सात सात एसएमएस   पाठवू लागले .
     एक दिवस मी एसएमएस   टाईप केला दररोज एक सफरचंद डॉक्टरला दुर ठेवते , पण आठवड्यातुन एकाच दिवशी सात सफरचंद खाणे योग्य नव्हे.  
     चटकन माझ्या लक्ष्यात आले की , एसएमएस   बाबतीत माझ्याकडुन नेमकी हिच चूक घडत होती . मी स्वतःला सुधारले . दररोज संगणकावर बसु लागले . आठवड्यातून एकदाच सात संदेश न पाठवतात दररोज एकच संदेश पाठवायला सुरुवात केली .
     आहे की नाही गंमत ! जे सल्ले आम्ही इतरांना देत असतो , त्या सल्ल्याची सर्व प्रथम आम्हालाच गरज असते .

Wednesday 12 October 2011

मराठी बोधकथा मुर्ती



      एक मुर्तीकार होता . तो दगडामधुन विविध प्रकारच्या कलाकृती , मुर्त्या घडवत असे. आतापर्यंत त्याने अनेक कलाकृती दगडातून साकारल्या होत्या . अनेक महापुरुषांच्या मुर्त्या घडवलेल्या होत्या . त्याने साकारलेल्या कलाकृती श्रीमंताच्या घरात विराजमान झाल्या होत्या आणि त्याने घडवलेल्या मुर्ती मंदिरात आणि चौकात स्थापीत झाल्या होत्या .
      एके दिवशी हा मुर्तीकार अगदी तल्लीनतेने एका दगडातून कुठलीशी मुर्ती घडवत होता .थोड्या अंतरावरुन एक व्यक्ती बारकाईने या मुर्तीकाराचे निरिक्षण करत होता. मुर्तीकार छिन्नी हातोडा दगडावर चालवत होता . ती व्यक्ती उत्कंठेने सारे काही बघत होती .
      थोड्यावेळाने ती व्यक्ती मुर्तीकाराजवळ गेली आणि हात जोडून म्हणाली तुम्ही महान आहात , निसर्गाने तुम्हाला हे अनमोल वरदान दिले आहे . तुमच्या हातात जादू भरली आहे . जेणेकरुन तुम्ही इतक्या छान मुर्ती बनवू शकता .
       मुर्तीकार त्या व्यक्तीला नम्रपणे म्हणाला , मी कोणतीही मुर्ती बनवत नाही . मुर्ती दगडामध्ये आधीच लपलेली असते. मी फक्त तिच्यावरील दगडाचे अनावश्यक पापुद्रे तेवढे बाजूला सारतो .  
      मुर्तीकाराचे हे उत्तर अत्यंत समर्थक आहे . ते जसे मुर्तीला लागू आहे तसेच आमच्या व्यक्तीमत्वालाही लागू आहे . आमच्या प्रत्येकात आदर्श व्यक्तीमत्वाची मुर्ती लपलेली आहे . परंतु या मुर्तीवर काम , क्रोध, लोभ, मद , मोह , मत्सर , या विकारांच्या पापुद्रामागे लपुन जाते .
       जर आमच्यातून सुंदर मुर्ती साकारायची असेल , व्यक्तीमत्वाला सुबक आकार हवा असेल, तर विकारांचे पापुद्रे दुर सारायला हवेत . त्यासाठी छिन्नी हातोड्याचे घाव सोसण्याची तयारीही ठेवावीच लागेल .     

Tuesday 11 October 2011

मराठी बोधकथा रंग



  
     आम्ही जेव्हा लहान होतो. तेव्हा गल्लीमध्ये शरबत, बर्फाचे गोळे विकणारा गाडीवाला यायचा . त्याच्या गाडीला घंटा टांगलेली असायची . ती घंटा वाजवत वाजवत तो त्याची गाडी गल्लीमध्ये पुढे ढकलत न्यायचा . त्याच्या हातातल्या लोखंडी पट्टीने तो शरबताच्या बाटल्यावर प्रहार करायचा . कधी ती पट्टी त्या रंगीत बाटल्यावरुन फरकन खेचायचा . त्यामुळे निर्माण होणारा आवाज अजुनही कानात घुमतो आहे.
     आम्ही मुली त्याच्या त्या घंटीचा आणि बाटल्यांचा आवाज ऐकून त्याच्या गाडी भवती गोळा व्हायचो. सोबत आईकडून हट्ट करुन मागितलेले पाच दहा पैशाचे नाणे असायचे . रंगीत गोळा घेण्यासाठी मुलींची झुंबड उडायची .
      कुणी हिरवा गोळा मागत असे, कुणी निळ्या रंगाचा मागत असे तर कुणीही लाल रंगाचा बर्फाचा गोळा मागत असे . बरे हा प्रत्येक गोळा प्रथम पांढर्‍या रंगाच्या बर्फापासुनच बनायचा ! गाडीवाला हातात फिरवायच्या मशिने बर्फ किसून घ्यायचा मग मध्यभागी काडी ठेवून काचेच्या ग्लासात किसलेला बर्फ दाबला की झाला गोळा तयार . त्यावर तो बाटलीतील रंगीत शरबत शिंपडायचा . हे रंगीत शरबत साखरयुक्त असल्यामुळे गोळ्याला रंग आणि गोडवा प्राप्त व्हायचा . चव आणि गंध मात्र सर्व गोळाचा सारखाच. वस्तुतः कोणत्याही विशिष्ट रंगासाठी आग्रह  धरण्याचा काहीही कारण नव्हते . पण तरीही आम्ही  विशिष्ट रंगाच्या गोळ्याचा आग्रह धरायचो .
      आता मोठ झाल्यावर लहानपणीची ही कृती हास्यास्पद वाटते . पण आता तरी आम्ही खरोखरच मोठे झालो आहेत का ? स्वतःला विविध धर्माचे अनुयायी म्हणवणारे लोक, त्यांचे वागणे लहानमुलांच्या वागण्यापेक्षा भिन्न आहे का ? कुणी हिरव्या रंगाची पताका तर कुणी भगवा ध्वज तर कुणी निळ्या झेड्यासाठी आग्रह धरतो आहे . त्याला त्याने धार्मिक भावना असे गोडंस नाव दिले आहे परंतु हे सर्व रंग ज्या परमात्म्याशी संबंधीत आहे तो परमात्मा बर्फाच्या गोळ्यातील गोडव्याप्रमाणे सर्वत्र एकच आहे. याचा माणूस कधी विचार करणार आहे का ? 

मराठी बोधकथा विस्तार




     विश्वाच्या निर्मितीच्या अनेक सिध्दांतापैकी अत्यंत महत्त्वपुर्ण आणि मान्यता पावलेला सिध्दांत म्हणजे      महास्फोटाचा सिध्दांत अर्थात बिग बॅग थेअरी . निर्मितीच्या पुर्वी विश्व हे एका बिंदूमध्ये सागावले होते.  त्या बिंदुचा स्फोट झाला . त्यामधून द्रव्य बाहेर पडले. स्फोटामूळे हे द्रव्य एकदुसर्‍यापासुन दुर जावू लागले. दाही दिशांना हे द्रव्य पसरले . त्या द्रव्यापासून आकाशगंगा , तारे , ग्रह , उपग्रह , धुमकेतू , अशनी , या सर्वाची निर्मिती झाली. महास्फोटातुन निर्माण झालेले हे विश्व त्याच्या जन्मापासून आजपर्यंत प्रसरण पावत आहे. आकाशगंगा एकमेकांपासून दूर जात आहेत . प्रसरणशिलता हे या विश्वाचे व्यवछेदक लक्षण आहे. त्याचा विस्तार होण्यातच त्याचे अस्तित्व लपलेले आहे. एका अर्थाने या विस्तारानेच जिवन जन्माला घातले आहे. विस्तार म्हणजे जीवन आणि आकुंचन म्हणजे मृत्यु !
       झाडाची बी आम्ही जमीनीच पुरतो . तिला पाणी घालतो . बी ला कोबं फुटते, त्यापासून डेरेदार झाड तयार होते . तयार झालेले हे झाड त्या बिजाचाच विस्तार आहे . असा कोणी कल्पनाही करु शकनार नाही की इवल्याशा बिजामध्ये एवढा मोठा वृक्ष लपलेला असेल . परंतु जेव्हा ते बिज विस्तारीत होते, तेव्हा वृक्ष आकाराला येतो . जिवन जन्माला येते .
      मनुष्य प्राणी आणि इतर प्राणी हे बिजाचाच विस्तार आहेत . झाडाचे बी जमीनीत पेरले जाते आणि प्राण्यांच्या बिजाची जोपासना गर्भाशयात होते . गर्भाशयात बिजाचा विस्तार होतो आणि जीवन आकाराला येते .
      जीवनाच्या मुळाशी विस्तार असल्याचे सर्वत्रच दिसुन येते . परंतु विकास झाला म्हणणारी माणसे इतरांपासून तुटत जातात . नातेवाईक -  मित्र यांचा पसारा कमी होतो . आकुंचीत होतो . विस्ताराच्या विरुध्दची क्रिया सुरु होते . आणि जीवनाच्या मुळाशी तर विस्तार आहे . समाजापासून तुटणारी ही माणसे खरोखरच विकासाकडे जातात की विनाशाकडे  ?

Monday 10 October 2011

मराठी बोधकथा - रुमाल




        रुमाल हा शब्द मोठा मजेशिर आहे . लहाणपणी गावात रुमालमध्ये लोक सामान , भाजीपाला बांधून  नेत असल्याचे मी पाहिलेले आहे . त्यामुळे  रुमाल म्हणजे भाजीपाला बांधून नेण्यासाठी जवळ बाळगावयाचा चौकोनी कापड . असा लहानपणी माझा समज होता . अर्थात वाढत्या वयाबरोबर हा गैरसमज असल्याचेही लक्षात आले.
        दुपट्टा आणि रुमाल हे एकाच कुळातले , पण दुपट्टा आकाराने मोठा म्हणून तो रुमालाचा मोठा भाऊ ! तसेच शहरी भागात कुणी फारसा दुपट्टा वापरत नाही . शहरात रुमाल वापरतात आणि ग्रामिण भागात गळ्यात दुपट्टा टाकलेले लोक हमखास भेटतात . या अर्थाने दुपट्टा हा खेड्यात राहणारा तर रुमाल हा त्याचा शहरात राहणारा भाऊ !
       स्वातंत्र्याचे म्हणाल तर दुपट्टा अधिक स्वतंत्र आहे . तो गळ्यात छानपणे लोंबकाळत असतो. मस्तपैकी ताजी हवा खात असतो . पण रुमालाला फडकवण्याचे स्वातंत्र्य नाही. त्याची सदा घडी केलेली आणि खिशात कोंबलेली . स्वच्छ मोकळी हवा रुमालाच्या नशिबात नाही पण काही का असेना ! रुमाल आणि दुपट्टा हे दोघेही अत्यंत उपयुक्त हे मात्र तितकेच खरे . सर्दी झाली असेल , तर हे सत्य मान्य करायला मिनिटभर वेळ लागणार नाही .
     असेच एकदा एकटी  बसली होती . रुमाल काढला . त्याने चेहरा पुसला ! रुमालाकडे मी निरखून पाहीले एखाद्या परोपकारी व्यक्तीने दुसर्‍याचे कष्ट आपल्या अंगावर घ्यावे त्याप्रमाने रुमालाने माझा घाम टिपुन घेतला होता . गंमत म्हणुन मी त्या रुमालाला गाठी पाडायला सुरुवात केली . पहिली गाठ पाडली , मग दुसरी , मग तिसरी , अशा जेवढ्या गाठी येतील तेवढ्या गाठी मी त्या रुमालाला पाड्ल्या . आता तो रुमाल न दिसता गाठी पाडलेल्या एखाद्या दोरी सारखा दिसत होता . त्याच्या त्या रुपाकडे पाहून माझ्या मनात विचार आला , आता हा घाम पुसू शकेल काय ? अर्थातच त्या गाठिच्या रुमालाला घाम पुसणे शक्य नव्हते .
      मन आणखी पुढे विचार करू लागले . रुमाल हा आमचे व्यक्तिमत्त्व , वाईट सवई या गाठिसारखा ! त्या जडल्या की व्यक्तिची उपयुक्तता संपली .

Friday 7 October 2011

मराठी बोधकथा धार्मिकता


       वृक्षाचे महत्त्व सांगणारी अनेक सुभाषिते संस्कृत भाषेमध्ये आहेत . वृक्षवल्ली आम्हा सोयरे असे संत तुकारामांनी म्हटले आहे. अनेक कवींनी झाडे वेली यांच्यावर कविता केल्या आहेत.
     झाडे आहेतच तशी महत्त्वपुर्ण . झाडे आहेत म्हणुन जीवन आहेत . ज्या दिवशी झाडे संपतील त्या दिवशी पृथ्वीवरील जीवन संपलेलं असेल . मागे उरतील ओस पड्लेले मोठमोठे कारखाने !
      आमच्या संस्कृतीमध्ये झाडांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आदिवासींच्या गुफाचित्रामध्ये झाडे रेखाटलेली आढळतात . वारल्यांच्या चित्रामध्ये झाड हमखास असतात. झाडे आडनाव असणारी माणसे आमच्याकडेही आहेत . कंदब , आंबेवडे , पिंपळगावकर , वडगाव , पिंपळगाव अशी झाडांची नावे असणारी गावे ही हमखास सापडतात.
       आमच्या प्रत्येक धर्मामध्ये झाडांना महत्त्व आहे . मुस्लिम धर्म आणि खजुराचे झाडे यांचे नाते आहे. ख्रिश्चनांना ख्रिसमस ट्री प्राणप्रीय तर बौध्दांना बोधिवृक्ष पुजनीय वाटतो . वटसावित्रीला हिंदु महिला वडाच्या झाडाची पुजा करतात. सणप्रसंगी आब्यांची पानांचेच तोरण लावले जाते . तुळशीवृदांवन प्रत्येक हिंदुच्या घरी हमखास सापड्ते .  शिवाय उबंर , पिंपळ इ. झाडे देखिल हिंदु धर्मात पवित्र मानलेली आहेत.
        झाडाप्रमाणेच आम्ही माणसे प्रतिमेमध्ये ही देव पाहतो . परंतु प्रतिमा निर्जिव  असते व झाड जिवंत असते. निर्जिव असणार्‍या प्रतिमेची थोडी विटंबना झाली, तर त्या त्या धर्मियांच्या भावना उफ़ाळून येतात . लोक रस्त्यावर उतरतात. रास्ता रोको करतात . परंतु धर्मामध्ये महत्त्वपुर्ण स्थान असणारे जिवंत झाड कुणी तोडले तरी फारशी दखल घेत नाही . स्वतःला धार्मिक  म्हणवणारे आम्ही सर्वच धर्माचे लोक , आमच्या डोळ्यादेखत झाडांची कत्तल होतांना तरी आम्ही स्वस्थ बसून राहात असू , तर स्वतःला धार्मिक म्हणवण्याचा आम्हाला खरोखरच काही नैतीक अधिकार उरतो काय ?



Sunday 2 October 2011

मराठी बोधकथा कवच




   पृथ्वीवर विविध प्रकारचे हवामान आढळते . टुड्रां प्रदेश अतिशय थंड आहे, तेथे सदैव  बर्फ़ पसरलेला असतो. लोकांना अंगावर प्राण्यांची कातडी ओढून राहावे लागते. विषुवृत्तीय प्रदेशातील वातावरण उष्ण , भरपुर पडणारा पाऊस त्यामुळे दाट जंगले . मोठमोठ्या नद्याची सुपिक मैदाने तेथे लोकांची दाटीवाटीची वस्ती कारण मैदानी प्रदेशात शेतीला चांगला वाव जेथे नफ्याची शक्यता तेथे माणसाची धाव .
    सुपिक प्रदेशाप्रमाणेच पृथ्वीवर वाळवटें देखील आहेत . वाळवंटातील जीवन अतिशय अडसर तुटपूंजा रडणारा किंवा मुळीच न पडणारा पाऊस , त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य , शेती नाही आणि पशूपालना वरही मर्यादा आलेल्या . दिवसांचे भयंकर तापमान आणि रात्री शरीर गारठवून टाकणारी थंडी . तरी माणूस मोठा जिद्दी . हटकून काही जमाती वाळवंटी प्रदेशात राहतातच !
     वाळवंटी प्रदेशातील प्राणीही मोठे मजेशिर जाड कातडीचे . उटांला तर वाळवंटातील जहाज म्हणतात . याशिवाय सरडे , साप , विंचू , अशा प्राण्यांचा वाळवंटात भरणा. म्हणजे वाईटात आणि वाईट असेच म्हणावे लागेल .
      वाळवंटातील वनस्पती पण आपले खास वैशिष्ट्य जोपासणार्‍या . खुरट्या आकाराचा आणि काटेरी वाळवंटात साप ,विंचू , सरडे याच्या सोबतीला काटेरी वनस्पतीच का ? कारण स्पष्ट आहे . जसे तुम्ही असाल तसेच तुम्हाला मित्र ही लाभतील !
    वाळवंटातील काटेरी वनस्पतीचे काटे , फळे खाण्यार्‍या प्राण्यांपासून त्यांचे संरक्षण करतात . या झाडांना जर काटे नसते , तर ही झाडे प्राण्यांनी कधीचीच नष्ट करुन टाकली असती . काटे हे या झाडांचे संरक्षण कवच आहे . हज़ारो वर्षापासून हे कवच या वनस्पतींनी जपले आहे . वाळवंटातल्या वनस्पतीप्रमाने तरुणीनाही भय आहे, ते समाजातील काटेरी माणसाचे . ही काटेरी माणसे कधी ओरबाडतील याचा नेम नाही . अंगभर कपडे हे संरक्षण करणार्‍या कवचासारखे रक्षण करणारे . फारसे लक्ष आकर्षीत होवू  न देणारे . आता हे संरक्षण कवच फेकून देण्यासाठी फॅशनच्या नावाखाली स्पर्धा लागलेली आहे . आपल्या हिताचे आपल्यालाच भान नसावे ! यापेक्षा मोठे दुदैव काय असू शकेल ?








Sunday 4 September 2011

मराठी बोधकथा विरह



       मार्च महीण्याचा मध्यकाळ होता . रविवारचा दिवस होता . दुपारची वेळ होती . दुपारच्या रणरणीत उन्हात जाणार तरी कोठे?मी घरीच होते . घरची सगळी मंडळी बाहेरगावी गेलेली . उन्हाळा जाणवत होता . ए.सी नाहीच म्हणून लावण्याचा प्रश्नच नव्हता . कुलर अद्याप बाहेर काढला नव्हता . सातत्याने डोक्यावरचा पंखा तेवढा फिरत होता . पंख्याची हवा गरम वाटत होती .
            बराचकाळ पंख्याची ती गरम हवा मी घेत होते. पण आता असाह्य झाले होते . या उष्ण वातावरणावर काही उपाय सापडत नव्हता . कंटाळून मी पंखा बंद करुन टाकला. तशीच खोलीमध्ये खुर्चीवर बसुन राहीली . पंख्यापासुन येणारी हवा बंद झाल्यामुळे अंगाला घामाच्या धावा लागल्या . उष्णता असह्य वाटू लागली . आता पुन्हा मी पंखा सुरु केला . आणि काय तो चमत्कार पंख्याची हवा एकदम गार वाटू लागली .
         डोक्यात विचारचक्र फिरु लागले . आधीही पंखा फिरत होता . हवा येत होती . तेव्हा ती हवा गरम येत होती . आता थंड वाटत आहे . हे कसे ? उत्तर सापडले , विरह . पंखा आधीपासुन सुरु होता . त्यामुळे त्याने केलेले काम जाणवत नव्हते . पंखा बंद केला घामाच्या धारा वाहू लागल्या . पंखा सुरु केला पुन्हा हवा वाहू लागली . घामाच्या धारा बंद झाल्या .
       अशावेळी , बायकोला कंटाळला असाल तर तिला पंधरा दिवसांकरिता माहेरी जावू द्या . तीचे महत्त्व कळेल . नवर्‍याला कंटाळला असाल  तर तुम्ही काही दिवस त्याच्यापासुन दुर राहून बघा ! नौकरीला कंटाळला असाल तर एक महिण्याच्या रजेवर जा . एक महिना बिनकामाचे बसुन राहा . तीच नौकरी प्रिय वाटू लागेल . बायकोला हातचा स्वयंपाक चविष्ट वाटत नसेल तर चार महिने मेसचा डबा लावा . मग तो डबा बेचव वाटू लागेल . आणि बायकोच्या हातचा स्वयंपाक चविष्ट वाटू लागेल. सगळी विरहाची महिमा !
     थोडक्यात सांगायचे तर अनेक महत्त्वपूर्ण आणि मोल्यवान गोष्टी आमच्या आजूबाजूला असतात . हवा , पाणी , मुबलक प्रमाणात आणि विनासायास मिळतात . म्हणून आम्हाला कधी त्यांचे महत्त्व वाटत नाही . आणि आम्हीही त्यांची किंमत करत नाही . हाच नियम माणसांनाही लागू होतो . मिनिटभर हवा मिळाली नाही की , हवेचे महत्त्व पुरेपूर पटते ! माणसांनाही तसेच ती दुर गेल्यावरच त्यांचे खरी किंमत कळते .