Wednesday 12 October 2011

मराठी बोधकथा मुर्ती



      एक मुर्तीकार होता . तो दगडामधुन विविध प्रकारच्या कलाकृती , मुर्त्या घडवत असे. आतापर्यंत त्याने अनेक कलाकृती दगडातून साकारल्या होत्या . अनेक महापुरुषांच्या मुर्त्या घडवलेल्या होत्या . त्याने साकारलेल्या कलाकृती श्रीमंताच्या घरात विराजमान झाल्या होत्या आणि त्याने घडवलेल्या मुर्ती मंदिरात आणि चौकात स्थापीत झाल्या होत्या .
      एके दिवशी हा मुर्तीकार अगदी तल्लीनतेने एका दगडातून कुठलीशी मुर्ती घडवत होता .थोड्या अंतरावरुन एक व्यक्ती बारकाईने या मुर्तीकाराचे निरिक्षण करत होता. मुर्तीकार छिन्नी हातोडा दगडावर चालवत होता . ती व्यक्ती उत्कंठेने सारे काही बघत होती .
      थोड्यावेळाने ती व्यक्ती मुर्तीकाराजवळ गेली आणि हात जोडून म्हणाली तुम्ही महान आहात , निसर्गाने तुम्हाला हे अनमोल वरदान दिले आहे . तुमच्या हातात जादू भरली आहे . जेणेकरुन तुम्ही इतक्या छान मुर्ती बनवू शकता .
       मुर्तीकार त्या व्यक्तीला नम्रपणे म्हणाला , मी कोणतीही मुर्ती बनवत नाही . मुर्ती दगडामध्ये आधीच लपलेली असते. मी फक्त तिच्यावरील दगडाचे अनावश्यक पापुद्रे तेवढे बाजूला सारतो .  
      मुर्तीकाराचे हे उत्तर अत्यंत समर्थक आहे . ते जसे मुर्तीला लागू आहे तसेच आमच्या व्यक्तीमत्वालाही लागू आहे . आमच्या प्रत्येकात आदर्श व्यक्तीमत्वाची मुर्ती लपलेली आहे . परंतु या मुर्तीवर काम , क्रोध, लोभ, मद , मोह , मत्सर , या विकारांच्या पापुद्रामागे लपुन जाते .
       जर आमच्यातून सुंदर मुर्ती साकारायची असेल , व्यक्तीमत्वाला सुबक आकार हवा असेल, तर विकारांचे पापुद्रे दुर सारायला हवेत . त्यासाठी छिन्नी हातोड्याचे घाव सोसण्याची तयारीही ठेवावीच लागेल .     

No comments:

Post a Comment