Wednesday 19 October 2011

मराठी बोधकथा उपयुक्तता


      मानवाने आपल्या प्रगतीसाठी, मनोरंजनासाठी आजुबाजुच्या पशू पक्षांचा, झाडा वेलींचा उपयोग करुन घेतला आहे . मानवांने ज्याचा उपयोग करुन घेतला त्या सर्वांमधील समान गुण म्हणजे उपयुक्तता . परंतु मला प्रश्न पडतो तो वेगळाच !  उपयुक्तता ही स्वतःच स्वतःची शत्रु आहे काय ?
       गाय गोड दुध देते . गायीचे दुध पौष्टीक असते . म्हणुन तिला बांधुन ठेवतात . कोंडवाड्यात कोंडावे तसे गोठ्यात दररोज कोंडतात . बैलाच्या अंगी शक्ती आहे . तो गाडी, औत खेचू शकतो. पण तो काबूत राहीला पाहीजे म्हणुन त्याचे खच्चीकरण आणि नाकात वेसण ! घोडा वेगाने पळतो . त्याच्या पाठीवर बसुन माणसाला जलद गतीने प्रवास करता येतो . म्हणुन घोड्याकरिता लगाम . आणि जोरदार पळावे म्हणुन चाबकाचे  फटके . हत्तीच्या ताकदीचा वापर करता यावा व हत्ती काबुत राहावा म्हणुन त्याच्या पायी साखळदंड आणि अंकुशाचा मार . पोपट दिसायला सुंदर , मधुर बोलणारा म्हणुन त्याच्या वाट्याला पिंजर्‍यातील बंदिस्त जिवन . आम्ही वाझोट्या झाडाला दगड मारत नाहीत . तर त्याच झाडाला दगडाचा मार सहन करावा लागतो , ज्याला फळे लागलेली आहेत , उपयुक्तता ही स्वतःच स्वतःची शत्रु आहे काय ?
        कोणत्याही संघटनेत , कंपनीमध्ये , कार्यालयात कामसू आणि कामचोर असे कर्मचारी असतात. त्यापैकी कामचोर काम करणार  नाही म्हणुन साहेब त्यांला काम सांगत नाही . काम करणार्‍यावर दिवसेंदिवस कामाचे ओझे वाढत जाते .
        ऑफिसमधील कर्मचार्‍यांना सुटी पाहीजे असते . कामचोराला पटकन सुटी मिळते . कारण तो गेल्यामुळे साहेबांचे काहीच अडणार नसते पण काम करणारा कर्मचारी रजेवर गेला तर काम कसे होईल ? म्हणुन काम करणार्‍याला सहसा रजा मिळत नाही .
उपयुक्तता ही स्वतःच स्वतःची शत्रु आहे काय ?

No comments:

Post a Comment