Monday 29 August 2011

ऊस आणि चरक



     माझी एक मैत्रीण आहे. एकदा ती माझ्याकडे आली आणि मला सांगायला लागली की अमूक - अमूक व्यक्तिने त्यांच्या आईवडीलांचे फार हाल केले आहेत . आणि ते त्यांच्या कडून पाहावल्या जात नाही . आणि मग बोलण्याच्या ओघात ती मला सांगायला लागली की, बघं असं असतं ! आई वडीलांची तुलना उसाशी केली जाऊ शकते . आणि मुलं म्हणजे कोण तर रस काढणार चरक असतो.
     रस काढणारा हाताने तो रस काढत असतो . त्यामध्ये जेव्हा सुरुवातीला उस टाकतो . त्यामधून भरपुर रस येतो . मग पुन्हा त्याला दुमटतो आणि पुन्हा रस बाहेर पडतो . चिरकांड्या उडतात आणि पुन्हा मग जेव्हा अधिकाधिक वेळा तो ऊस त्या चरखामध्ये जातो तेव्हा मात्र रस बाहेर येत नाही . मग उरतो तो केवळ चोथा ! निरुपयोगी निष्फळ आणि मग कचर्‍याच्या पेढीमध्ये तो चोथा फेकुन दिला जातो .
     मुलं ही अशीच असतात , ती आई वडीलांना उसाप्रमाणे समजतात . जेव्हा आई वडील तरुण असतात . मुलं लहान असतात तेव्हा त्यांना आईवडीलकडे भरपूर देण्यासारखं काही असत म्हणुन ती मुलांना प्रिय असतात . परंतू जसं जसं वय होत जातं तसं तसं आई वडीलाजवळ देण्यासारखं काही उरत नाही . आणि मग मुलं त्यांना चोथा म्हणुन सोडुन देतात .
     कुठ रस्त्यावर तर कुठे वृध्दाश्रमात किंवा कधी कधी फारच द्याळू असेल , तर घराच्या ओसरीत . खरोखरच ! हे वागणे बरे आहे काय ? आईवडीलांना चोथ्याप्रमाने समजून फेकून देणार्‍यांच्या वाटेला पुढची पिढी तसेच वागणार नाही का ? जर आम्ही आमच्या आईवडीलांना उसाच्या चोथ्याप्रमाने कचरा पेटीत फेकत असु, तर आमच्याही वाटेला तसेच दिवस येणार नाही का ? याचा खरोखरच विचार करणे गरजेच आहे. आईवडीलांना निरुपयोगी समजुन त्यांना घरांबाहेर घालविणारे लोक खरोखर शहाणे आहेत काय ? 


Thursday 25 August 2011

मराठी बोधकथा उपयोग



        पृथ्वीच्या पाठीवर विविध प्रकारची झाडे आहेत . विविध प्रकारचे प्राणी आहे . ही झाडे आणि प्राणी आपआपल्या परीने मानवाच्या उपयोगी पडतात . जिवतंपणी आणि मेल्यावर सुध्दा !
       झाड जिवंत असतांना मानवाला शुध्द हवा देते . फळे, फुले .फांद्या पाने देते . फळे ही खाण्याच्या कामी येतात . फुले सजावतीच्या कामी येतात . देवाला वाहण्यासाठी उपयोगी पडतात . झाडांच्या पानापासुन पत्रावळ्या , द्रोण अशा उपयुक्त वस्तू बसतात . काही झाडांची पाने खाण्यासाठी देखील उपयोगी पडतात .   
      झाड मेल्यावर देखील निरुपयोगी बनत नाही . झाडांच्या फांद्या जाळण्यासाठी उपयोगी पडतात . खोडापासुन घरे , खिडक्या , टेबल, खुर्ची इ . विविध उपयोगी वस्तू बनतात .
      गाय जिवतंपणी दुध देते . बैल शेतामध्ये आमच्यासाठी राबराब राबतो. गाय बैल इ. मेल्यावरही मानवाच्या उपयोगी पडतात . त्यांची कातडी , हाडे , शिंगे , केस यापासुन विविध उपयोगी वस्तू बनतात. एकंदरित झाडे , प्राणी मेल्यावरही मानवी समाजाच्या उपयोगी पडतात .
     प्रश्न असा आहे की , मेलेल्या मानवाचा उपयोग काय ? मेलेल्या माणसाचा काहीही उपयोग असल्याचे दिसुन येत नाही . माणूस मेल्यावर त्याला तात्काळ पुरावे लागते किवा जाळावे लागते . यामध्ये विलंब झाला तर मेलेल्या माणसाइतकी उपद्रवी गोष्ट दुसरी नाही .
     माणूस मेल्यावर त्याचा समाजाला काहीही उपयोग नाही. हे सत्य माणसाने जिवंतपणी समजावून घेणे गरजेचे आहे. कारण हा जन्म जर व्यर्थ जावू न द्यावयाचा असेल तर जिवंतपणीच माणसाने काही कर्तव्य केले पाहीजे . जेणेकरुन समाजाला त्याचा काही उपयोग होवू शकेल .
        जिवंतपणी जर माणूस कामी नाही आला , तर त्याला मेल्यानंतर कामी येण्याची संधी नाही . वृक्ष , गाय, बैल, यांना ती संधी आहे . म्हणून चला कामाला लागूया . या नरदेहाचा मानवी समाजाला काही उपयोग होवू देवूया ! स्वार्थ आणि आळ्स झटकून कार्यप्रवण होवूया ! मरण काय सांगून येणार आहे ?    

Monday 22 August 2011

मराठी बोधकथा निवड


    लहानपणी घरची बरीच कामे मी करायची ! नौकरी निमीत्याने आई वडील कामात व्यस्त असायचे . त्यामुळे घरी किराणा आणणे . बाजारातुन भाजी - पाला आणणे ही जबाबदारी माझीच !
     कुठलासा सण होता . आईला पुजेसाठी नारळ हवे होते . कालच घरातील पाण्याचा माठही फुटला होता. आईने मला बाजारात धाड्ले आणि नारळ व माठ आणायला सांगितले .
     सर्वप्रथम मी वाण्याकडे गेली. नारळ पाहिजे असे सांगीतले . वाण्याने दुकानाच्या दरवाज्याजवळ नारळाचे पोते ठेवले होते . त्या पोत्यामधुन नारळ निवडुन घ्यायला त्याने मला सांगितले. मी नारळाच्या पोत्यामधुन नारळ निवडू लागली . त्यांना वाजवून बघू लागली . एक नारळ चांगला खणखणित वाजला पैसे देवून तो नारळ मी विकत घेतला .
       मग मी कुंभाराकडे गेली . माठ पाहिजे असे त्याला सांगीतले, त्याने माठ दाखविले . तो माठ दाखवित होता . ते माठ मी हातातल्या अंगठीने वाजवून बघत होते. कच्या माठातून बसका आवाज निघत होता . पक्के माठ खणखणित आवाज करत होते , टणटण असा खणखणित आवाज करणारा माठ मी विकत घेतला . घराकडे परत निघाली .
     वाटेत चालतांना डोक्यात विचारचक्र फिरु लागले. नारळाची निवड केली ती वाजवून . खडखड वाजला तोच नारळ निवड्ला . मठाची निवड केली ती वाजवून . टणटण वाज़ला तोच माठ निवडला . वाजवण्यासाठी आघात करावा लागला . आघात हा संकटासारखा .
     आमच्यावर येणारी संकटे ही आघातासारखी ती आम्हाला वाजवून बघतात . आम्ही टणटण वाज़लो नाही म्हणजे आम्ही त्यांना उत्तर दिले नाही. आम्ही टणटण वाजणे म्हणजे आम्ही संकटाना खणखणीत उत्तर देणे .
     निसर्गाला आमची निवड करावयाची असते . संकटाचा आघात करुन निसर्ग आम्हाला वाजवून बघतो . आम्ही या आघाताला खणखणित उत्तर दिले तर आम्ही पक्के आहोत असे मानून निसर्ग आमचीच  निवड करतो .
    तेव्हा यापुढे संकटाचा आघात झाला तर आपल्याला निवडण्यासाठी निसर्ग आपल्याला वाजवून बघतोय असे समजायला हरकत नसावी. 

Sunday 21 August 2011

मराठी बोधकथा मुलभूत गुणधर्म


 


मऊ असणारा दगड मला आजवर भेटला नाही .
टणक असलेला कापूस मला दिसला नाही .
थंड असणारा अग्नी मी कधी अनुभवला नाही
गरम असणार्‍या बर्फ़ाला मी आजवर स्पर्श केला नाही
उस मला कधी कडू लागला नाही
कारले पिकल्यावर खावून पाहिले तरी कडूच होते
झाडाकडून मला नेहमीच सावली मिळाली
 सापाने दंश दिला आणि
    विचंवाने डंख दिला . प्रेम त्यांनी कधी दिलेच नाही .
खरंच आहे ! कारण कठोरता हा दगडाचा गुणधर्म आहे . तो गुणधर्म त्यागला तर दग़ड राहत नाही . मऊपणा हा कापसाचा गुणधर्म आहे . गोड्पणा हा उसाचा आणि कडूपणा हा कारल्याचा गुणधर्म आहे . हे गुणधर्म सोडले तर , उस हा उस राहणार नाही आणि कारले हे कारले राहणार नाही . उष्णता हा अग्नीचा गुणधर्म आणि थंडपणा हा बर्फ़ाचा गुणधर्म.
     दंश करणे हा सापाचा गुणधर्म  आहे आणि डंख मारणे हा विचंवाचा गुणधर्म आहे . साप आणि विंचू यांच्याकडून प्रेमाची अपेक्षा न केलेली बरी !
      काहीही असो निसर्गातील प्रत्येकजण आपाआपल्या गुणधर्माला घट्ट चिकट्लेला आहे . काहीही झाले तरी आपला गुणधर्म सोडायला तयार नाही .
     मग मानवाचा मुलभूत गुणधर्म कोणता ? तर तो त्याच्या नावातच लपलेला आहे . मानवता हाच माणसाचा मुलभूत गुणधर्म मग वेळोवेळी मानव त्याचा हा मुलभूत गुणधर्म का सोडतो.  कधी कडू कारल्यासारख्या वागतो , अग्नीसारखा तापतो . आणि साप विचू सारखा दंश करतो . निसर्गात कोणीच आपला मुलभूत गुणधर्म सोडायला तयार नसतांना का म्हणून मानवाने मानवता सोडून अन्य पशूंसारखे वागावे ? गोडवा नसेल तर उसाला लोक ऊस न म्हणता कडबा म्हणतील मग मानवता सोडलेल्यांना मानव म्हणावे काय ?


Saturday 20 August 2011

स्टेअरिंग आणि देश


        माणसाच्या आयुष्यामध्ये विनोद अत्यंत महत्त्वपूर्ण साधण आहे . विनोद आम्हाला खळाळून हसायला लावतं . आमच्या डोक्यावरचा तान नाहीसा करतो , चिंता विसरावयास लावतो . चिंतेमध्ये असणार्‍या , संकटात असणार्‍या , खिंन्न मनस्थितीमध्ये असणार्‍या व्यक्तिने एखादा छानसा विनोद ऐकावा आणि खळाळुन हसावं . आणि उदासीनता तर फेकूनच द्यावी ऐवढे सामर्थ यामध्ये  आहे.    
        आजकाल दुरदर्शन किंवा अनेक वाहिण्यावर विनोदी कार्यक्रमाची लाट आलेली आहे. काही कार्यक्रम तर केवळ विनोदालाच वाहीलेले . वेगवेगळे विनोद सांगणारे ते विनोद सांगतात . सोबतच संगीत आणि असे कार्यक्रम मनाला भुरळ पाडतात . असाच एक कार्यक्रम पाहत होते आणि मग कार्यक्रमाचा विनोद सांगण्यात आला.
     एकदा काय़ होत . एक विमान अपघात होतो. आणि विमान अपघातमध्ये पायलट सह सर्व प्रवासी मरुन जातात. वाचतो तर फक्त एक माकड .  मग या माकडाची मुलाखात घेण्यासाठी सर्व चैनल वाले  त्याच्याकडे धाव घेतात. आणि माकडाला मग प्रश्न विचारतात माकड ऐटीमध्ये उत्तर देतो.
      पहिला पत्रकार माकडाला विचारतो की, अपघात झाला होता तेव्हा विमानातले प्रवासी काय करत होते ? माकडाने आपले हात गालाजवळ नेले . मान वाकवली आणि ते झोपले होते हे पत्रकारांना लक्षात आले. मग पत्रकारांनी माकडाला दुसरा  प्रश्न विचारला , की, विमान चालविणारा चालक काय करत होता ? मग पुन्हा माकडाने आपले दोन्ही हात गाला जवळ नेले मान वाकवली . डोळे मिटले आणि पत्रकार समजले की वैमानीक झोपला होता. मग तिसरा प्रश्न पत्रकाराने माकडाला विचारला की, तु काय करत होतास ? आणि मग माकडाने दोन्ही हाताने स्टेरिंग फिरवण्याचा अविर्भाव करत हालचाल केली आणि सर्व पत्रकार समजले की, माकड विमान चालवत होता. आणि परिणाम स्वरुप नाही व्हायचं तेच झालं !
     आमच्या आजुबाजूचं वातावरणही असचं आमची राजकीय व्यवस्था ही असीच तर ज्यांनी विमान चालवायचं , ज्यांनी या देशाचा गाडा चालवायचा . असे जबाबदार नागरिक जर झोपुन राहीले . ज्यांच्या हाती या देशाचं सुकाणू दिलेलं आहे ते लोक आपल्या कर्तव्याला चुकून झोपा काढायला लागले , कर्तव्याला चुकू लागले , तर मग माकडाच्या हाती या देशाची स्टेअरिंग यायला वेळ लागणार नाही.
     विनोद काल्पणिक आहे. माकड काल्पणिक आहे परंतू देश मात्र वास्तव आहे आणि या देशामधली माकड देखील वास्तव आहे.  या माकडाच्या हाती जर या देशाचं स्टेअरिंग आलं तर या देशाचा विमान अपघातासारखा अपघात होऊन कपाळमोक्ष व्हायला वेळ लागणार नाही. हे सांगण्यासाठी कोणत्याही भविष्य तद्न्याची गरज नाही.


Sunday 14 August 2011

मराठी बोधकथा साबण



     साबण हा रोजच्या आम्हाला स्पर्श करणारा आणि खरे सांगायचे झाले तर, आम्ही ज्याला स्पर्श करतो असा विषय . साबण फ़ार पुर्वीपासुन अस्तित्वात असावे असे म्हणतात . सिंधू संस्कृतीतले लोक साबण वापरत असावे . असा विव्दवानाचा अंदाज आहे . सम्राट अकबराच्या काळात लोणारच्या तळ्यातल्या क्षारयुक्त पाण्यापासून साबण बनविणारी            साबणकरी   नावाची जमातच अस्तित्वात होती. मन नाही निर्मळ ! तया काय करील साबण !! असे संत तुकारामांनी म्हटले आहे. म्हणजे संतशिरोमनी ना ही साबण माहीत होता.
        आता साबणाचे विविध प्रकार अस्तित्वात आलेले आहेत. अंग धुण्याचे साबण . त्यातही लहान मुलांचे वेगळे , महिलांचे वेगळे . पुरुषांचे वेगळे . त्यातल्या त्यात कष्टकरी पुरुषांचे डेटॉल , लाईफबॉय सारखे आणखी वेगळे . डोके धुण्याचे शिकेकाई युक्त साबण , कपडे धुण्याचे साबण , इतकेच काय भांडी धुण्याची साबण आणि कुत्रे मांजरी यांना आंघोळ करण्याकरीता वापरावयाचेही साबण बाजारात उपलब्ध आहेत .
         उन्हाळ्याचे दिवस होते . सुर्य आकाशात तळपत होता. सुर्याचा उष्णतेने अंग होरपळून निघाले होते. त्यातच दुचाकी वरुन कच्च्या रस्त्यावरचा प्रवास घडला. घरी आल्यावर आंघोळ करण्याशिवाय दुसरा कोणताही विचार मनामध्ये आला नाही . साबणाच्या वाहत्या फेसाबरोबर अंगावर जमलेली सगळी धुळ वाहुन गेली. प्रसन्न वाटायला लागले .
      हातातल्या साबणाच्या वडीकडे पाहुण विचार आला की , साबणाच्या वडीचा संबंध नेहमी मळाशी , धुळाशी आणी घाणीशी . मळ आणी धुळ यांच्या संपर्कात येवुनही साबण स्वत:मात्र कधीच मळत नाही. मळ आणि धुळीचा नाश करणारा साबण स्वत:नेहमी स्वच्छ राहतो, हा साबण मला व्यसनमुक्तीचे काम करणार्‍या कार्यकर्त्यासारखा वाटतो तो व्यसनी लोकांच्या सातत्याने संपर्कात राह्तो, पण व्यसन मात्र त्याला चिकटू शकत नाही !



मराठी बोधकथा बेडकाचा आदर्श



           तळ्याच्या काठी बेडकांची वस्ती होती. काही अतंरावर एक मनोरा उभा होता. समस्त बेडूक जमात , त्या मनोर्‍याच्या उंचीकडे पाहून स्मितीत होत असे. या मनोर्‍यावर आपल्याला चढता येईल काय ? असा विचार देखील काही तरुण बेडकांच्या मनात येत असे . पण वयाने मोठे झालेले बेडूक या तरुण बेडकांना समजावायचे , सागांयचे , बाबा ! मनोर्‍यावर चढण्यासाठी अंगी खुप ताकत लागते, मनोर्‍यावर चढणे हे आपल्या बेडकांचे कार्य नव्हे ! मनोर्‍यावर  चढ्ण्याचा प्रयत्न करणे , म्हणजे साक्षात मृत्यूला निमंत्रण ! तरुण बेडूक निरुत्साहित व्हायचे .
      एकदा तरुण बेडकांचा वार्षीक उत्सव होता. सर्व तरुण बेडूक  तळ्याच्या काठी जमले होते . अचानक कुणीतरी घोषणा फडकाविली की जो, मनोर्‍याच्या टोकापर्यंत चढून दाखवील त्याला विजयी विर म्हणुन घोषीत केले जाईल .

सर्व तरुण बेडकांनी मनोर्‍याकडे धाव घेतली . रस्त्यात म्हातारे बेडूक त्यांना धोके समजावून सांगत होते. ते ऐकून तरुण माघारी फिरत होते . सरते शेवटी फक्त तीन बेडुक मनोर्‍याच्या पायथ्याशी पोह्चले. तेथे जमलेल्या वृध्द बेडकाने मनोर्‍यावर चढण्यातील धोके मोठमोठ्याने समजावून सांगितले. दोन बेडूक माघारी फिरले पण उरलेला ऐक बेडूक मोठ्या जिद्दीचा होता. तो मनोर्‍यावर चढू लागला . जमलेले सर्व बेडूक पाहू लागले. परत फिरण्याची विनंती करु लागले . पण त्या बेडकाने कुणाचेही ऐकले नाही. तो चढतच गेला आणि शेवटी मनोर्‍याच्या टोकावर जावून पोहचला. सर्वांनी तोडांत बोटे घातली.
हा तरुण बेडुक जेव्हा खाली उतरला. तेव्हा सर्वांना त्याला उचलून घेतले. वाजत - गाजत त्याची मिरवणूक काढली . इतर बेडूक धोके समजावून सांगत असतांना तु कसा काय घाबरला नाही ? असे त्याला विचारले पण तो स्तब्धच . शेवटी हा बेडूक बहिरा असल्याचे इतर बेड्कांच्या लक्षात आले.
ज्यांना नविन वाटा चोखाळायचा आहेत, पण घरचे विरोध करताहेत , अशांसाठी हा बहिरा बेडूक आदर्श ठरावा !



मराठी बोधकथा ईश्वराचा शोध



   

    एक म्हातारी आजीबाई होती . ती दररोज शिवणकाम करत असे. नेहमी काहीतरी शिवत असे. म्हातारीचे शिवणकाम चालते , हे सर्वाना माहित होते.
      एका दिवशी संध्याकाळची वेळ होती . सुर्य मावळला होता. संघीप्रकाश कायम होता. घरातले दिसत नसले तरी अंगणातले मात्र दिसत होते . आणि अंगणभर फिरुन ही आजीबाई काहीतरी शोधत होती.
     म्हातार्‍या आजीचे काहीतरी हरवले आहे. ते शोधण्याचा ती प्रयत्न करत होती. हे काही लोकांनी पाहिले . ते आजीजवळ आले आणि त्यांनी तिला विचारले,  आजीबाई तुम्ही या अंगणात काय शोधताय ? आजीने त्यांना सांगीतले की, ती शिवणकाम करत होती आणि काम करता करता तिच्या हातून सुई पडली . पडलेली सुई शोधण्याचा ती प्रयत्न करत होती.
        लोकांनी सुई शोधायला सुरुवात केली . अंगणभर त्यांनी सुई शोधली पण सुई काही सापड्ली नाही. शेवटी थकुन ते आजीबाई जवळ आले आणि सुई नेमकी कुठे पड्ली ते विचारले .
    म्हातारी म्हणाली, सुई घराच्या आतमध्ये पडली होती. परंतू घरात खुप अंधार आहे . अंधारात सुई शोधणे शक्य नाही . म्हणुन मी अंगणात , उजेडात सुई शोधत होती. लोकांनी कपाळावर हात मारुन घेतला. म्हातारीला वेड लागले असे म्हणुन तेथून ते लोक निघुन गेले.
      आम्ही माणसे या म्हातारी प्रमाणेच वागत नाही काय ?संत महात्म्यांनी सांगुन ठेवले. ईश्वर मनुष्याच्या आत आहे . तो मनुष्याच्या हृदयामध्ये बसतो . पण आत शोधणे कठीण . बाहेर अंगणात शोधणे सोपे . म्हणुन मग आम्ही ईश्वराला , मंदिर , मस्जिद , चर्च, मध्ये शोधतोय . दगड आणि मुर्तीमध्ये शोधतोय . पण म्हातारीची सुई जर घरात पडली असेल, तर ती अंगणामध्ये सापडू शकत नाही , हे आम्हाला पटकन लक्षात येते . परंतू मानवाला हृदयात राहणारा ईश्वर,  मंदिर - मस्जिद - चर्च दगड मुर्तीमध्ये सापडणे शक्य नाही , हे मानवाला का कळू नये ?  





मराठी बोधकथा सावकार आणि अजगर



टी . व्ही एक अजबच वस्तु म्हटली पाहीजे ! क्षणात एक विचार दाखवेल , तर दुसर्‍या क्षणाला दुसरा विचार, दुसरी घटना , आणि दुसरी वस्तू दाखवेल . त्यात केबलच्या या  युगात शेकडो चैनल आपल्यावर वर्षाव करत आहेत . रिमोट हाती घ्यायचा आणि बटनं दाबली की वेग वेगळी चैनल हजर.
अशीच एकदा टी. व्ही पाहत बसलेले होते. दुरदर्शन लावलेला आणि बातमी सुरु होती. शेतकर्‍यांच्या आत्महत्येची . कुठल्याशातरी शेतकर्‍याची जमीन सावकारी पाशात अडकलेली ! दिवसेदिवस त्याचा कर्जाचा डोंगर वाढतच गेला आणि चढत्या दराने व्याजाची आकारणी होत गेली. आधीच कर्जात बुडालेला शेतकरी , अडचणीत अडकलेला शेतकरी , घर कसं चालवावं ? बियाणं कसे आणावे ? फ़वारणीला पैसे कुठुन आणावे ? निदंनाला पैसे कसे जुळवावे ? यामध्ये अडकलेला शेतकरी बिचारा कसा पैसे फेडणार आणि त्या सावकाराने त्या शेतकर्‍याची शेती गिळंकृत केली. शेवटी व्यथित होऊन , मन दुखी होऊन त्या शेतकर्‍याने फ़ास लावून घेतला. दुरदर्शनवर ती बातमी सारखी झळकत होती . बातमी ऐकुन मन शुन्य झाले .
जरा डिस्कवरी चैनलवर काय सुरु आहे म्हणुन मी डिस्कवरी चैनल लावले . सापाविषयी माहिती देणारा कार्यक्रम सुरु होता . नाग अत्यंत जहरी , विषारी . हा नाग चावला तर मनुष्य एकदम मरुन जातो . नागाच्या एका दंशामध्ये किती माणसं मारण्याची ताकत आहे, हे डिस्कवरी चैनलवरचा अभ्यासक सांगत होता . मग अजगरची पाळी आली. अजगर बिन विषारी . तो आपल्या भक्षाभोवती आपला फ़ास आवळतो त्याची हाड मोडुन टाकतो आणि ह्ळू -  ह्ळू आपल्या पाश अधीकच आवळून शेवटी भक्षाचा जिव घेवून टाकतो मग त्याला  गिळंकृत करतो.
डोक्यामध्ये विचार आला की, समजा, जंगलामध्ये चोर दरोडेखोर आहेत . ते माणसाच्या समोर येतात. एकदाच सापाने दंश करावा तसाच घाव घालतात. असा घातला की, माणसाचा खेळ ख़लास . माणुस कायमचा गतप्राण . नागाने दंश करावा तसा. परंतू समाजातले सावकार त्या अजगरासारखे. हळूहळू पाशा आवळणारे आणि सरते शेवटी जिव गुदमरुन टाकणारे!
     जिव गुदमरुन सावज मरावं तसा सावकराच्या कचाट्यात सापडलेला शेतकरी. त्याच्या पाशात सापडून मरणार ! दुसरं काय ? निर्सगात अजगर जो खेळ खेळतात तेच खेळ सावकार माणसाच्या आयुष्यामध्ये खेळ्तात.  







मराठी बोधकथा सहज उपलब्धता




         जगात अनेक महापुरुष होऊन गेलेले आहेत . लोकांच्या उध्दारासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले म्हणुन जग़ आज त्यांना वंदन करते . त्यांचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवून लोक मार्गक्रमन करतात . काहीनी अपार पराक्रम गाजविले म्हणुन त्यांचा गौरव केला जातो.
          महापुरुषांचे जिवन चरित्र मला नेहमीच आकर्षण वाटत रहिले आहे. कित्येक महापुरुषांच्या जीवनचरित्राचा मी अभ्यास केला. त्यांच्या  चरित्र्यामध्ये मला  काही समान दुवेही सापडले .
        महाभारतातील कर्ण , एकलव्य , आधूनिक काळातील म. फुले , म. कर्वे , डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या चरित्र्यामधिल समान दुवा म्हणजे शिक्षणासाठी त्यांना करावे लागलेले कठोर परिश्रम .
       कर्ण सुतपुत्र म्हणुन द्रोणाचार्याने  शिष्यत्व नाकारले . शेवटी खोटे बोलून का होईना अन्यत्र गुरुकुलात प्रवेश मिळवावा लागला. एकलव्य महान पराक्रमी परंतू अर्जुनाला स्पर्धक नको म्हणून गुरुदक्षिणेच्या नावाखाली द्रोनाचार्यानी अंगठा कापून घेतला.
       म. फुले माळी जातीतले . शुद्राने शिकुन काय करायचे ? म्हणून शिक्षणाला घरातून आणि घराबाहेरुन विरोध . म . कर्वे यांना शिक्षणासाठी प्रचंड पायपीट करावी लागली.
     डॉ. बाबासाहेबांना आज जग वंदन करते परंतू त्याच्या शालेय जिवनात त्यांना एका कोपर्‍यात बसून शिक्षण घ्यावे लागले. शाळेतील नळाचे पाणी प्यायला बंदी , फळ्याला हात लावायला मनाई . सातत्याने विटाळ होईल या शब्दांचा भडिमार !
     शिक्षण घेतांना या सर्व महापुरुषांना अनंत अडचणी आल्या . पण ते खचले नाही. कर्ण सर्वश्रेष्ट धनुहीर बनला . एकलव्य अर्जुनाला तोडीस तोड ठरला . म. फ़ुलेंनी स्त्री शुद्रांच्या शिक्षणांची मुहुर्तेमेढ रोवली . कर्वेनी महिला शिक्षणाची पताका उचलण्याची बाबासाहेबांनी अस्पृशांना त्यांचा हक्क मिळवून दिला.
     आज शिक्षण सर्वासाठी खुले आहे. तरी मुलांनी शाळेत यावे म्हणुन शिष्यवृत्ती , फी माफी , खिचडी अशा योजना राबवाव्या लागतात . शिक्षण सहज मिळू लागले परंतू नवे फुले , नवे बाबासाहेब घडताना दिसत नाही . एखादी गोष्ट सहज मिळू लागली की, तिचे महत्त्व राहत नाही , ते यालाच म्हणत असावे .


मराठी बोधकथा सुरक्षितता



     एकदा एका बागवानाने गुलाबाची बाग लावली . तो त्या बागेतील गुलाबपुष्पाचे जिवापाड रक्षण करु लागला. तो झाडांना खत घालायचा, पाणी घालायचा, झाडांची छाटणी करायचा पडलेली पाने वेचुन बाग स्वच्छ करायचा . झाडावर लागलेल्या गुलाबाच्या कळ्यांना वाटायचे की या जगात आपला खरा रक्षक आणि हितचिंतक कोणी असेल तर, तो हा बागवानच आहे . आपल्या झाडाला लागलेले हे काटे विनाकारण आहेत . त्यामुळे गुलाबाचे झाड विनाकारण कुरुप दिसत आहे . बागवानाचे संरक्षण असतांना आपल्याला इतर संरक्षणाची काय गरजच आहे?
असेच दिवस निघुन गेले. कळ्यांचे रुपांतर फुलात झाले . डोलदार फुले फांदा फादांवरुन डोलत होती . बागवानाला पैशाची गरज पड्ली. फुले विकून त्याने ही गरज भागविण्याचे ठरविले . हातात कात्री घेवून तो फुलांना तोडण्यासाठी बागेत आला. त्याचा हा नवा अवतार पाहून फुलांना तर रडूच कोसळले. काही फुले मृच्छित झाली . काट्यांनी शक्य तेवढा प्रतिकार केला . पण शेवटी बागवान सर्व फुले तोडून घेवून गेला .
जिवापाड जपलेली फुले बागवान तोडून नेतो कारण , त्यांचा उपभोग घेण्याचा लालसा आणि क्षमता त्याच्यामध्ये आहे . म्हणुनच जुन्या काळामध्ये जनानखानाचा अंमलदार म्हणून तृतीयपथिंयाची नेमणुक करत असावे . जेणेकरुन कुंपण शेत खाणार नाही . कुंपनावर आमचा गाढ विश्वास पण कुंपणच शेत खायला लागले तर दाद कोणाकडे मागायची ? म्हणुन अशाच कुंपणाची निवड केलेली बरी ज्याला शेत खाण्याची लालसा निर्माण होणार नाही .
कडक सुपारी ही सर्वदात पडलेल्या जख्ख म्हातार्‍याकडे ठेवणे सर्वात सुरक्षित म्हटले पाहिजे . कारण तिचा उपभोग घेण्याची क्षमता व लालसा त्याच्यामध्ये नसते . तुम्ही तुमच्या सुपार्‍या ज्यांच्याकडे सुपुर्द केल्या आहेत, त्यांना दात नाहीत ना ? पुन्हा एकदा खात्री करुन घ्या .   






मराठी बोधकथा डाकू




जगात दोन प्रकारचे डा शस्त्र धारण करतात . आणि आमच्या पोटावर ते चालवतात.  त्यातला पहिला म्हणजे  डाकू . एक जंगल आहे . त्या जंगलामधून एक व्यकी जातोय . तो धनिक आहे . आणि अचानक एक डाकू तेथे येतो . त्या धनिकाला धन मागतो . धनिक ते देण्यास नकार देतो आणि डाकू त्या धनिकाच्या पोटामध्यक चाकू खुपसतो . धनिकाचा म्रुत्यु होतो . .
दुसरा डा म्हणजे डॉक्टर . एक धनिक आहे त्याच्या पोटामध्ये खूप दुखतय तो डॉक्टरांकडे जातोय आणि डॉक्टर त्याच्या पोटावर आपल्या जवळच्या चाकू सारखे हत्यारे चालवितो . त्याचे पोट फ़ाडतो . या दोन्ही डा च्या हाती शस्त्र आहे . आणि दोन्ही डा धनिकाच्या पोटावर शस्त्र चालवित आहेत . परंतु डाकूने चालविलेल्या शस्त्रामुळे धनिक मरणार हे निश्चित आहेत . उलट  डॉक्टर जे शस्त्र चालवितो त्यामध्ये धनिकाला जिवनदान मिळणार आहे . जरी कृती सारखी असली तरीही त्या मागचा हेतू अत्यंत महत्त्वपुर्ण आहे . जेव्हा आमचा हेतू सकारात्मक असतो, हितकारक असतो . तेव्हा आमची कृती समर्थनिय ठरते .
डाकूचा शस्त्र चालविण्याचा हेतू हा निंदणीय आहे . स्वार्थी , लुटारु आहे . इतरांना त्रास देणारा आहे . त्याची कृती म्हणूनच निंदणीय ठरते . तर डॉक्टरचा शस्त्र चालविण्याचा हेतू हा सकारात्मक आणि सन्मानार्थ ठरतो . यावरुन आपल्याला हे दिसुन येते की, हेतू आणि विचारसरणी अत्यंत महत्त्वाची असते . आयुष्यामध्ये डाकू होवून काम करायचे की, डॉक्टर होवून काम करायचं हा पर्याय मात्र प्रत्येकापुढे उभा असतो . त्यापैकी आपण कोणता पर्याय निवडायचा हे ज्याचे त्यालाच ठरवायचं असते .

मराठी बोधकथा चला डोळे तपासुया !





माणुस इतकी प्रगती करु शकला याचे कारण त्याचा उन्नत मेन्दु . पण एकटा उन्नत मेन्दुच मानवाच्या आतापर्यंतच्या प्रगतीला कारणीभुत ठरला असे नाही. मानवाने उन्नत अवयवही त्याच्या प्रगतिसाठी तितकेच सहाय्याभुत ठरले आहेत. मेन्दु ने केलेला विचार कृतित आणण्यासाठी शेवटी अवयवच कामी येतात . अन्यथा मानवाच्या मेन्दुपेक्षा जास्त वेगाने विचार करु शकणार्‍या एखाद्या संगणकानेही अधिक वैयक्तिक प्रगती करुन दाखविली असती पण तसे होताना दिसत नाही .

तसे आपल्या शरिराचे सगळेच अवयव महत्वाचे म्हणावे लागतील . कान नसतील तर ऐकू येणार नाही . जीभ नसेल तर बोलता येणार नाही . हात नसतील तर काम करता येणार नाही . आणि पाय नसतील तर चालता येणार नाही . पण या सगळ्या अवयवापेक्षा मला डोळे अधिक महत्वाचे वाटतात . कारण आपण जेवढे द्यान ग्रहण करतो त्यापैकी अधिकाधिक द्यान आम्ही डोळ्यावाटे ग्रहण केलेलेच असते . डोळे नसतील तर सर्वत्र काळोख .

निसर्गालाही डोळे अत्यत महत्वाचे वाटले म्हणुन त्याने त्याना कवटीच्या सुरक्षीत खोपडीत, सर्वोच्च स्थानी विराजमान केले . डोळ्याना कोणतीही इजा होवू नये . त्यावाटे दुरवरचे दिसावे अशी निसर्गाची यामागची योजना असल्याचे दिसून येते.
आम्हाला दोन डोळे आहेत. परतु दोन डोळ्यानी पाहुन ही जी वस्तु आम्ही पाहतो, ती जर एक असेल, तर आम्हाला एकच दिसते. दोन वस्तु दिसत नाही, तसे पाहिले तर दोन डोळ्याना दोन वस्तु दिसावयास होत्या , पण तसे होत नाही .  एकाच्या जागी जर दोन वस्तु दिसायला लागल्या तर डोळ्यात बिघाड झाला आहे . असे मानुन आम्ही डोळे तपासण्यासाठी डॉक्टराकडे धाव घेतो .

एक असणारी वस्तु एकच दिसली पाहिजे हा आमचा आग्रह . मग , जगात परमेश्वर एकच आहे ! तर अनेक थोर महात्म्यानी वारवार सागुनही आम्हाला हिन्दुचा देव वेगळा , मुसलमानाचा देव वेगळा , ख्रिश्चनाचा देव वेगळा, असे वेगवेगळे देव पाहण्याची सवय का लागली आहे. सर्व धर्मीयाना देव एकच का दिसत नाही. चला डोळे तपासुन घेवुया ! काही बिघाड आहे वाटते !

मराठी बोधकथा रडणे आणि हसणे

 



    बशिर बद्र   यांनी त्यांच्या एका शेर मध्ये म्हटले आहे .  घरापासुन मस्जीद दुर आहे , चला एखाद्या रडणार्‍या लहान बालकाला हसवू या ! म्हणजेच   रडणार्‍या लहान बालकाला हसायला लावणे  हे ईश्वराची नमाज पढण्याइतकेच तोलामोलाचे काम आहे , असे बशिर बद्र यांना म्हणावयाचे आहे.
       हसणे आणि रडणे हे आयुष्यारुपी स्थायी दोन चाके आहेत . आयुष्यात केवळ रडणे असेल, तर आयुष्याचा आनंद घेता येत नाही आणि आयुष्यात केवल हसणे असेल , तर आयुष्य निरस झाल्याशिवाय राहणार नाही . शेवटी गोड पदार्थांना चव कवी म्हणुन काही प्रमाणात मिठ घालावेच लागते.
            आम्ही जेव्हा लहान असतो तेव्हा हसणे आणि रडणे हे दोन्हीही आम्ही मुक्तपणे करतो . हसतांना कोण काय म्हणेल ? आणि रडतांना इतरांना कसे वाटेल ? याचा आम्ही विचार करत नाही . वाढत्या वयाबरोबर विचार वाढू लागतात आणि मग आम्ही रडतांना चारदा विचार करतो . भावना लपविण्याचा प्रयत्न करतो . आणि हसतांनाही जरा जपूनच हसतो . परिणामत: या भावना दाबल्या जातात . आणि जगामध्ये दमन हे अत्यंत वाईट . दाबलेले कोणत्या वाटे बाहेर पडेल याचा नेम नसतो . म्हणून हसणे , रडणे या भावनांना मुक्त बाब मिळणे गरजेचे आहे.
            
  हसणे आणि रडणे या दोन्ही क्रियामध्ये चेहर्‍यावरिल स्नायुंचा वापर होतो. हसणे रडणे यामुळे या स्नायुंना व्यायाम मिळ्तो. रडणाच्या तुलनेत हसतांना अधिक स्नायुंचा वापर होतो. म्हणून निदान अधिक स्नायुंचा व्यायाम मिळावा म्हणून हसलेले बरे ! या जगात आम्ही पदापर्ण केले ते रडत रडत . आम्ही जेव्हा मरण पावतो तेव्हा आजुबाजूचे  सगे सोयरे टाही फ़ोडतात . जीवनाच्या सुरुवातीला आणि शेवटी रडणे ठेवलेलेच आहे. परंतू मधल्या कालखंडात हसणे आपल्या हाती आहे. चला हसत     जगूया !





Friday 12 August 2011

टूथपेस्ट




शरीराची स्वच्छता अत्यंत महत्वाची . त्यातल्या त्यात दातांची स्वच्छता अधिकच महत्वाची . दातांची जर निगा राखली नाही तर किडू शकतात . तोंडाचा घाण वास येवू लागतो . सडलेले दात काढून टाकावे लागतात . जीवघेण्या वेदना सहन कराव्या लागतात .
दातांची निगा राखायला मनुष्य फार पुर्वी शिकलेला असावा. कडूनिबांच्या छोट्या फांदीपासुन दातून बनविण्याची परंपरा फार जूनी आहे. बाभळीच्या फांदीपासुन बनलेल्या दातुनने अनेकजण दात घासतांना दिसतात .टुथब्रश दररोज तोच वापरल्यामुळे तो जंतूयुक्त होवू शकतो .परंतू दातून वापरणार्‍यांना हा धोका मुळीच नाही.
दातूनच्या व्यतिरीक्त वनस्पतींपासून बनलेले घरगुती मंजन, काळे मंजन , पांढरी पावडर , आयुर्वेदिक मंजन अशा अनेक साधनांचा दात स्वच्छ करण्यासाठी वापर केला जातो. परंतू या सर्वामध्ये टूथपेस्ट अधिक लोकप्रिय आहे .
टुथपेस्टवरुन आठवले . काही दिवसापुर्वी सकाळी उठले होते . जरा झोपेच्या अधिनच होते . ब्रशवर लावण्यासाठी टूथपेस्ट दाबली. जरा जास्तच दबली. ! अनावश्यक  टूथपेस्ट मी आत ढकलण्याचा प्रयत्न करु लागले. पण भरपुर प्रयत्न करुनही यश आले नाही. टूथपेस्ट ट्युबमध्ये आत परत घालता आली नाही.
त्या टूथपेस्टकडे मी पाहात होती. डोक्यात विचारचक्र फिरायला सुरुवात झाली होती. टूथपेस्ट बोललेल्या शब्दासारखी . ट्युब म्हणजे आपले तोंड . पेस्ट बाहेर काढणे आपल्या मर्जीतले. काय बोलायचे ते आपण ठरवू शकतो. परंतू एकदा बोललेले शब्द परत घेता येत नाहीत . एकदा बाहेर पडले म्हणजे पडले !
  म्हणून जरा सांभाळुन बोला ! असेच ती पेस्ट मला सांगत असावी !    

मराठी बोधकथा अपत्य


असेच एक झाड होते . त्याला मधुर फळे लागायची . सावली घनदाट होती. मुले त्या झाडाच्या सावलीत खेळायची . पाथंस्थ विसावा घ्यायचे .
झाडाखाली खेळायला येणार्‍या मुलांपैकी एका मुलाचा झाडाला लळा लागला .तो मुलगा झाडाला दररोज भेटायला येवू लागला. झाड त्या मुलाला दाट सावली आणि मधुर फळे द्यायचे . मुलाचे बोबडे बोल ऐकुनच झाडाचे पोट भरायचे . एक दिवस जरी मुलगा नाही आला तर तो आजारी पडला असेल काय ? त्याला काही झाले असेल काय ? अशी चिंता झाडाला वाटायची . दोघांच्या भेटण्याच्या , मैत्रीचा क्रम बरेच दिवस चालला.
पुढे मुलगा मोठा झाला. त्याचे लग्न होते. लग्नामध्ये खुप सारे पाहुणे जेवायला येणार होते .एवढ्या पाहुण्यांना कसे वाढायचे ? ताटे कोठुन आणायची ? मुलगा आपली चिंता घेवुन झाडाकडे गेला . झाडाने आपली सर्व पाने दिली व पत्रावळ्या करायला सांगितल्या .
पुढे मुलगा संसारात रमला . झाडाकडे जाईनासा झाला. पैशाची चणचण जाणवली . मग मुलगा झाडाकडे गेला. झाडाने आपली सर्व फळे देवुन टाकली . मुलाने ती बाजारात विकली . बरेच पैसे मिळाले .
पुढे घरी जाळायला विंधन नव्हते . पुन्हा अडचण सांगायला मुलगा झाडाकडे गेला. झाड म्हणाले माझ्या फांद्या तोडून घेवून जा . मुलाने कुर्‍हाडीने फांद्या तोडल्या . झाड बोडके झाले पण मुलाची अडचण दुर झाल्याचा पाहुन आनंदितच होते.
पुढे मुलाला घर बांधायचे होते . त्यासाठी त्याला लाकुड हवे होते . पुन्हा त्याला झाडाची आठवण झाली. गरज पड्ल्याशिवाय तो झाडाला भेटतही नसे मुलगा झाडाकडे गेला. आपली अडचण सांगितली झाड म्हणाले, माझा बुंधा तोडुन घेवुन जा .मुलाने कुर्‍हाडीने सपासप घाव घातले. बुंधा तोडला . घर बांधले .
जागी उरले फक्त झाडाचे खुंट . त्याला मुलाची खुप आठवण येते .पण मुलगा आता त्याच्याकडे ढुकुनही पाहात नाही. आई वडील या झाडासारखे. मुलांच्या शिक्षणासाठी , त्याच्या रोजगारासाठी, लग्नासाठी आपले सर्व काही देऊन टाकतात . मग काहीही शिल्लक न उरलेले आई वडिल मुलांना झाडांच्या खुंटांसारखे निरुपयोगी वाटतात . आई वडिल आतुरतेने मुलांची वाट बघतात . मुले मात्र ढुंकुनही पाहात नाहीत .






Tuesday 9 August 2011

मराठी बोधकथा अंडे आणी विट


 
कोंबडीचे अंडे आणी घराच्या बांधकामासाठी वापरण्यात येणारी विट यांच्यात एका बाबतीत साम्य आहे ते कोणत्या बाबतीत आहे ? जरा ओळखुन दाखव ! मैत्रीणीने माझ्यापुढे कोडे टाकले . मला विचारचक्रात अडकवुन स्व:त पसार झाली .
मी विचार करु लागले, बांधकामाची  विट आणी कोंबडीची अंडे यात काय साम्य असणार ? खुप विचार करुनही उत्तर न सापडल्यामुळे शेवटी शेजारी सुरु असणार्‍या बांधकामावरुन दोन विटा आणि बाजारातुन अर्धा डझन अंडी घेवुन घरी आले . खूप निरीक्षण केले पण उत्तर सापडले नाही .
दुसर्‍या दिवशी तिच मैत्रीण पुन्हा माझ्याकडे आली , काय सापडले काय उत्तर ?  मी नकारार्थी मान हलविली आणि आता तुच साम्य काय ते साम्य दाखवं ! असे म्हणुन ती अंडी आणि विटा तिच्यापुढे ठेवल्या .
मैत्रीणने हातात अंडे घेतले . ते उभे ठेवले आणि दाबले . पण ते फ़ुटले नाही . अंड्याला आडवे केले आणि दाबले . ते  चटकन फ़ुटले . मग तिने दोन फ़ुटावरुन हातात उभी धरलेली विट खाली सोडली . विटीला काहीच झाले नाही . मग तेवढ्याच अंतरावरुन तिने आडवी धरुन विट खाली सोडली. आता मात्र विट फुटली .
विट आणि अंडे उभे असेपर्यंत फ़ुटत नाही . आडवे होताच फ़ुटते . हे त्या दोघांमधील साम्य माझी ती मैत्रीण मला सांगत होती . मला असले उत्तर अपेक्षीत नव्हते आणि त्याचा मैत्रीणीला जरा रागच आला होता .
खरोखर विचार करु जाता उभे अंडे किंवा विट आडवी होताच फ़ुटली होती . डोक्यात विचारचक्र सुरु झाले . माणुस त्या विट किंवा अंड्यासारखा . तो जो पर्यंत खंबीरपणे उभा आहे. सजग आहे, तो पर्यंत कोणीच त्याचे भवितव्य बिघडवू शकत नाही . पण जर का तो सुस्तावला , जरा आडवा झाला की , त्याचे भवितव्य फ़ुटण्याची शक्यता बळावते .
सदैव खंबिरपणे उभे राहा . जग तुमचे काही बिघडवू शकत नाही अंडी आणी विट कदाचित हाच संदेश देत असावेत .