Sunday 14 August 2011

मराठी बोधकथा सुरक्षितता



     एकदा एका बागवानाने गुलाबाची बाग लावली . तो त्या बागेतील गुलाबपुष्पाचे जिवापाड रक्षण करु लागला. तो झाडांना खत घालायचा, पाणी घालायचा, झाडांची छाटणी करायचा पडलेली पाने वेचुन बाग स्वच्छ करायचा . झाडावर लागलेल्या गुलाबाच्या कळ्यांना वाटायचे की या जगात आपला खरा रक्षक आणि हितचिंतक कोणी असेल तर, तो हा बागवानच आहे . आपल्या झाडाला लागलेले हे काटे विनाकारण आहेत . त्यामुळे गुलाबाचे झाड विनाकारण कुरुप दिसत आहे . बागवानाचे संरक्षण असतांना आपल्याला इतर संरक्षणाची काय गरजच आहे?
असेच दिवस निघुन गेले. कळ्यांचे रुपांतर फुलात झाले . डोलदार फुले फांदा फादांवरुन डोलत होती . बागवानाला पैशाची गरज पड्ली. फुले विकून त्याने ही गरज भागविण्याचे ठरविले . हातात कात्री घेवून तो फुलांना तोडण्यासाठी बागेत आला. त्याचा हा नवा अवतार पाहून फुलांना तर रडूच कोसळले. काही फुले मृच्छित झाली . काट्यांनी शक्य तेवढा प्रतिकार केला . पण शेवटी बागवान सर्व फुले तोडून घेवून गेला .
जिवापाड जपलेली फुले बागवान तोडून नेतो कारण , त्यांचा उपभोग घेण्याचा लालसा आणि क्षमता त्याच्यामध्ये आहे . म्हणुनच जुन्या काळामध्ये जनानखानाचा अंमलदार म्हणून तृतीयपथिंयाची नेमणुक करत असावे . जेणेकरुन कुंपण शेत खाणार नाही . कुंपनावर आमचा गाढ विश्वास पण कुंपणच शेत खायला लागले तर दाद कोणाकडे मागायची ? म्हणुन अशाच कुंपणाची निवड केलेली बरी ज्याला शेत खाण्याची लालसा निर्माण होणार नाही .
कडक सुपारी ही सर्वदात पडलेल्या जख्ख म्हातार्‍याकडे ठेवणे सर्वात सुरक्षित म्हटले पाहिजे . कारण तिचा उपभोग घेण्याची क्षमता व लालसा त्याच्यामध्ये नसते . तुम्ही तुमच्या सुपार्‍या ज्यांच्याकडे सुपुर्द केल्या आहेत, त्यांना दात नाहीत ना ? पुन्हा एकदा खात्री करुन घ्या .   






1 comment:

  1. halli nakali daat fix karun milatat..ashaweli kai karaiche?

    ReplyDelete