Wednesday 19 October 2011

मराठी बोधकथा उपयुक्तता


      मानवाने आपल्या प्रगतीसाठी, मनोरंजनासाठी आजुबाजुच्या पशू पक्षांचा, झाडा वेलींचा उपयोग करुन घेतला आहे . मानवांने ज्याचा उपयोग करुन घेतला त्या सर्वांमधील समान गुण म्हणजे उपयुक्तता . परंतु मला प्रश्न पडतो तो वेगळाच !  उपयुक्तता ही स्वतःच स्वतःची शत्रु आहे काय ?
       गाय गोड दुध देते . गायीचे दुध पौष्टीक असते . म्हणुन तिला बांधुन ठेवतात . कोंडवाड्यात कोंडावे तसे गोठ्यात दररोज कोंडतात . बैलाच्या अंगी शक्ती आहे . तो गाडी, औत खेचू शकतो. पण तो काबूत राहीला पाहीजे म्हणुन त्याचे खच्चीकरण आणि नाकात वेसण ! घोडा वेगाने पळतो . त्याच्या पाठीवर बसुन माणसाला जलद गतीने प्रवास करता येतो . म्हणुन घोड्याकरिता लगाम . आणि जोरदार पळावे म्हणुन चाबकाचे  फटके . हत्तीच्या ताकदीचा वापर करता यावा व हत्ती काबुत राहावा म्हणुन त्याच्या पायी साखळदंड आणि अंकुशाचा मार . पोपट दिसायला सुंदर , मधुर बोलणारा म्हणुन त्याच्या वाट्याला पिंजर्‍यातील बंदिस्त जिवन . आम्ही वाझोट्या झाडाला दगड मारत नाहीत . तर त्याच झाडाला दगडाचा मार सहन करावा लागतो , ज्याला फळे लागलेली आहेत , उपयुक्तता ही स्वतःच स्वतःची शत्रु आहे काय ?
        कोणत्याही संघटनेत , कंपनीमध्ये , कार्यालयात कामसू आणि कामचोर असे कर्मचारी असतात. त्यापैकी कामचोर काम करणार  नाही म्हणुन साहेब त्यांला काम सांगत नाही . काम करणार्‍यावर दिवसेंदिवस कामाचे ओझे वाढत जाते .
        ऑफिसमधील कर्मचार्‍यांना सुटी पाहीजे असते . कामचोराला पटकन सुटी मिळते . कारण तो गेल्यामुळे साहेबांचे काहीच अडणार नसते पण काम करणारा कर्मचारी रजेवर गेला तर काम कसे होईल ? म्हणुन काम करणार्‍याला सहसा रजा मिळत नाही .
उपयुक्तता ही स्वतःच स्वतःची शत्रु आहे काय ?

मराठी बोधकथा प्लास्टिकची फुले



  
     ग्रंथालयाचे अनेक फायदे आहेत . वाचकांना अत्यल्प मोबदला मोजुन ग्रंथ वाचायला मिळतात . एवढ्या विविध प्रकारचे ग्रंथ खरेदी करणे कोणत्या एका व्यक्तीच्या आवाक्यातील नसते आणि समजा एखाद्याने प्रत्येक ग्रंथ स्वतः खरेदी करुन वाचायचे म्हटले तरी एकदा वाचून झालेल्या ग्रंथाचे पुढे काय करायचे ? ते व्यवस्थेत कोथे ठेवायचे . असे प्रश्न निर्माण होतातच .
     
    ग्रंथालयाला इंग्रजीमध्ये आम्ही लायब्ररी म्हणतो पण लायब्ररी ही फक्त पुस्तकांचीच असू शकते काय ? माझ्या ओळखीत असा एक मुलगा आहे जो पोस्टर लायब्ररी चालवतो म्हणजे भिंतीवर आम्ही विविध देखावे लावतो . तेच ते देखावे बघून बघून अगदी डोळे विटून जातात . नवीन काहीतरी भिंतीवर लावावेसे वाटते पण जुन्यांनी  आधीच जागा व्यापुन टाकलेली असते . शिवाय नविन देखावे पोस्टर आणल्यावर जुने कोठे ठेवायचे ? असा प्रश्न पड्तो  . पोस्टर लायब्ररी चालविणारा हा मुलगा महिण्यातुन एकदा वर्गणीदाराच्या घरी जातो आणि भिंतीवरचा जूना देखावा काढुन नविन देखावा लावून जातो . त्याच्याकडे असे अंनेक देखावे आहेत आणि ते तो फिरत्या क्रमाने वर्गणीदारांच्या घरी लावत असतो .  लोकांना देखील अल्प मोबदल्यात नवनवीन देखण्यांचा आस्वाद घ्यायला मिळ्तो .

       नुकताच अशा एक युवकाशी माझा परिचय झाला , तो फुलांची लायब्ररी चालवतो . हा मुलगा आठवड्यातुन एकदा वर्गणीदारांचा घरी जातो आणि त्याच्या फुलदाणीमधील फुलांचे जुने गुच्छ काढुन नविन लावून देतो कागदाची आणि प्लास्टीकची ही फुले अशा पध्दतीने घरोघरी फिरत राहतात . लोकांनाही अल्प मोबदल्यामध्ये नवनवीन पुष्परचनेचा आस्वाद घ्यायला मिळतो . नाहीतर ऐरवी धुळ बसुन काळपट पदलेली फुले फुलदाणीत घाण मांडुन बसलेली असतात .
       एकदा असाच हा मुलगा आला त्याने फुलदाणीतील फुले बदलली आणि निघुन गेला. त्या मुलाने लावलेल्या फुलांचे मी निरीक्षण करु लागली . प्लास्टिकची ती फुले टवटवीत दिसत होती . पण प्लास्टिकची असल्यामुळे त्यांना कोणताही सुगंध नव्हता . ही प्लास्टिकची फुले  मला तोंडावर खोटे खोटे हास्य आणणार्‍या व्यवहारी माणसारखी वाट्ली . प्लास्टिकची फुलांसारखी ही माणसे वरवर प्रसन्नवदन दिसत असतात परंतु प्लास्टिकची फुलांत जसा कोणताही सुगंध नसतो, तसा या माणसांच्या वागण्यात कोणताही प्रेमभाव नसतो . असतो तो फक्त व्यवहार !
 

Tuesday 18 October 2011

मराठी बोधकथा घर पाहावे बांधून !



       घर पाहावे बांधून , लग्न पाहावे करुन अशी एक म्हण आहे . माणसांची ही म्हण कदाचीत पक्षांतही असावी . कारण पक्षी आपला जोडीदार निवडतात, संसार थाटतात, घर ही बांधतात , पिलांना जन्म देतात आणि संगोपनही करतात .
      माणसांच्या घर बांधण्याच्या तर्‍हा निरनिराळ्या आहेत . काही घरे शेणा मातीची, कुडाची , सारवलेली . काही दगडमातीची , कौलारु छ्प्पर असलेली . तर काहीवर टिनपत्र्याचे छप्पर . काही घरे पक्की विटा सिंमेंटाने बांधलेली आणि वर स्लॅब घातलेली . एका खोलीपासून ते शेकडो खोल्या असणारी माणसांची घरे आहेत . एक दिवस एका खोलीत राहायचे म्हटले तरी वर्षभर पुरतील एवढ्या खोल्या असणारी अवाढ्य घरे माणसांनी बांधून ठेवलेली आहेत .
       माणसांच्या घरबांधणीमध्ये गरजेला कमी महत्त्व असून, ऐपतीला जास्त महत्त्व आहे. ज्याची जेवढी मोठी ऎपत , जेवढा अधिक खर्च करण्याची तयारी , त्याने तेवढे मोठे घर बांधावे . पक्षी मात्र गरजेपेक्षा मोठे घर बांधत नाहीत . पक्षांमध्ये गरीब चिमणी श्रीमंत चिमणी असा भेद नाही . सर्व चिमण्यांची घरे सारखीच गरजेनुसार बांधलेली . उगीचच आहेत म्हणुन चिमणी अवाढ्य घर बांधत नाही .
      मुळामध्ये पक्षी स्वतःसाठी घर बांधत नाही . पक्षी घर बांधतात . आपल्या पिल्लासाठी . पिल्ले लहान असेपर्यंत घरट्यात राहतात . एकदा मोठी झाली की, आई वडिलांचे घरटे सोडून स्वतंत्र राहतात. आईवडीलांनी बांधलेली घराचा मोह त्यांना होत नाही.
       आम्ही माणसे घर बांधतो . ती स्वतःसाठी व मुलांसाठी बांधतो मुले मोठी होतात. आपल्या पायावर उभी राहतात . पण वडिलोपार्जित घराचा मोह मुलांना सुटत नाही . आई वडिलांकडे ते घरात हिस्सा मागतात . प्रसंगी डोके फ़ोडण्यापर्यंत मजल जाते . वडिलोपार्जित घरासाठी भांडणार्‍या या मुलांनी पक्षांपासुन काहीतरी धडा घ्यावा .

Monday 17 October 2011

मराठी बोधकथा - गती



        संस्कृतमध्ये जगाला      जगत असे म्हटले आहे .  जगत या शब्दाचा अर्थ ,   जेथे सर्व काही गतिमान आहे आणि ते शब्दशः खरे ही आहे. म्हणुनच हे जग आहे गतिशिलता हा या विश्वाचा मुलभूत नियम  आहे . या विश्वात आपल्याला सर्वत्र गतिमानता पाहायला , अनुभवायला मिळते .
     विश्वामधील आकाशगंगा या गतीमान असुन त्या एक दुसर्‍यापासुन दुर दुर जात असल्याचे हबल दुर्बिनीद्वारे केलेल्या निरिक्षणातुन स्पष्ट झाले आहे. काही आकाशगंगा या सर्पीलाकार असुन त्या स्वतःभोवती फिरत आहेत .
      आकाशगंगामध्ये तारे फिरत आहेत . तार्‍यांना आपले ग्रहमंडळ असते . हे ग्रह त्या तार्‍यांभोवती फिरत आहेत . ग्रहांना उपग्रह आहेत . उपग्रह हे ग्रहाभोवती फिरत आहे.
     विश्वातील प्रत्येक पदार्थ हा अणूंपासुन बनविला आहे. या अणुंमध्येही गतीशिलता प्रत्ययास येते .अणूच्या केंद्राकामध्ये असणार्‍या प्रोट्रोन आणि न्युट्रोन भोवती इलेक्ट्रोन प्रकाशाचा वेगाने फिरत आहे .
    पिंडी पासुन ब्रम्हाडापासुन सर्वत्र गतीशिलता आहे आणि ही गतीशिलता आहे. म्हणुनच जीवनाचे अस्तित्व आहे .
      पण माणुस मात्र वेगळ्या दिशेने वाटचाल करतोय . त्याने वाहनांचा शोध लावला आणि स्वतःचालणे थांबविले . यंत्राची व वाहनाची गती वाढली , माणसाची मात्र खुंटली कामाच्या नावाखाली माणसे एकाच जागी खुर्चीत तासनतास बसुन राहतात . गती हे जीवनाचे , तर स्थिरता हे मृत्युचे लक्षण . माणसाची ही गतीहिनता त्याला अनेक व्याधी जडण्यास कारणीभूत ठरते . कामाच्या नावाखाली एकाच जागी स्थिरावलेल्या माणसाला खुर्चिचे अनेक रोग जडतात .
      या रोगांपासून मुक्तता मिळवावयाची असेल , तर विश्वाचा मुळाशी असणारा गतीशिलतेचा नियम माणसांनी पाळला पाहिजे. निदान सकाळ संध्याकाळ तरी काही वेळ पायी फिरले पाहिजे . अन्यथा गतिहिनता विनाशाकडे नेल्याशिवाय राहणार नाही .  

Saturday 15 October 2011

मराठी बोधकथा अति सर्वत्र विवर्जयेतः



      बदली झाली की गाव सोडावे लागते . घर बदलते . आजूबाजूचे लोकही बदलतात. तरीही आधीच्या गावची काही माणसे या ना त्या कारणामुळे आठवणीत राहतात . काही जाणीवपुर्वक संपर्कात राहतात.
      पुर्वीच्या काळी दुरवरच्या माणसाशी संवाद साधायचा म्हणजे कठीणच बाब होती . संदेशवहनाची साधणे तितकीशी विकसित झालेली नव्हती . मग एखादा मनुष्य काही कामानिमित्य दुसर्‍या गावाला जायचा . तो ज्या गावी जात असे , त्या गावात जर काही नातलग राहात असतील , तर पहिल्या गावातील माणसे अशा जाणार्‍याबरोबर निरोप द्यायची मग असा प्रवासाला निघालेला व्यक्ती सवड काढुन त्या गावकर्‍यांच्या नातलगाकडे जायचा आणि निरोप सांगायचा .
     टपालखात्याचा विकास झाला . एका गावातल्या माणसाचा संदेश दुसर्‍या गावात टपाल खाते पोहचवू लागले . पत्रलेखन ही एक कला बनली . अर्थात पत्र लिहून देणे आणि वाचुन दाखविणे या माध्यमातून पत्राची भाषा निरक्षरांनाही उमगू लागली .
     आता टेलीफोन आणी मोबाईलचे युग आहे, त्यामुळे पत्र विशेष या गोष्टी मागे पडल्या आहेत . मोबाईलवरुन एसएमएस करणे सहजसुलभ झाले आहे आणि रिक्षावाला , मोलकरीण सर्वांकडे मोबाईल पोहोचला आहे .
     माझी एक मैत्रीण मला दररोज एसएमएस करते . उत्तरादाखल मलाही तिला एसएमएस करावा लागतो . बर्‍याचदा या एसएमएस मध्ये थोरमोठ्यांचे विचार असतात .
     एसएमएस वर होणारा खर्च वाचविण्यासाठी मी वेबसाईटवरुन संदेश पाठवू लागले . दररोज संगणकावर बसणे शक्य नसल्यामुळे आठवड्यातुन एकदाच संगणकावर बसुन मैत्रीणीला सात सात एसएमएस   पाठवू लागले .
     एक दिवस मी एसएमएस   टाईप केला दररोज एक सफरचंद डॉक्टरला दुर ठेवते , पण आठवड्यातुन एकाच दिवशी सात सफरचंद खाणे योग्य नव्हे.  
     चटकन माझ्या लक्ष्यात आले की , एसएमएस   बाबतीत माझ्याकडुन नेमकी हिच चूक घडत होती . मी स्वतःला सुधारले . दररोज संगणकावर बसु लागले . आठवड्यातून एकदाच सात संदेश न पाठवतात दररोज एकच संदेश पाठवायला सुरुवात केली .
     आहे की नाही गंमत ! जे सल्ले आम्ही इतरांना देत असतो , त्या सल्ल्याची सर्व प्रथम आम्हालाच गरज असते .

Wednesday 12 October 2011

मराठी बोधकथा मुर्ती



      एक मुर्तीकार होता . तो दगडामधुन विविध प्रकारच्या कलाकृती , मुर्त्या घडवत असे. आतापर्यंत त्याने अनेक कलाकृती दगडातून साकारल्या होत्या . अनेक महापुरुषांच्या मुर्त्या घडवलेल्या होत्या . त्याने साकारलेल्या कलाकृती श्रीमंताच्या घरात विराजमान झाल्या होत्या आणि त्याने घडवलेल्या मुर्ती मंदिरात आणि चौकात स्थापीत झाल्या होत्या .
      एके दिवशी हा मुर्तीकार अगदी तल्लीनतेने एका दगडातून कुठलीशी मुर्ती घडवत होता .थोड्या अंतरावरुन एक व्यक्ती बारकाईने या मुर्तीकाराचे निरिक्षण करत होता. मुर्तीकार छिन्नी हातोडा दगडावर चालवत होता . ती व्यक्ती उत्कंठेने सारे काही बघत होती .
      थोड्यावेळाने ती व्यक्ती मुर्तीकाराजवळ गेली आणि हात जोडून म्हणाली तुम्ही महान आहात , निसर्गाने तुम्हाला हे अनमोल वरदान दिले आहे . तुमच्या हातात जादू भरली आहे . जेणेकरुन तुम्ही इतक्या छान मुर्ती बनवू शकता .
       मुर्तीकार त्या व्यक्तीला नम्रपणे म्हणाला , मी कोणतीही मुर्ती बनवत नाही . मुर्ती दगडामध्ये आधीच लपलेली असते. मी फक्त तिच्यावरील दगडाचे अनावश्यक पापुद्रे तेवढे बाजूला सारतो .  
      मुर्तीकाराचे हे उत्तर अत्यंत समर्थक आहे . ते जसे मुर्तीला लागू आहे तसेच आमच्या व्यक्तीमत्वालाही लागू आहे . आमच्या प्रत्येकात आदर्श व्यक्तीमत्वाची मुर्ती लपलेली आहे . परंतु या मुर्तीवर काम , क्रोध, लोभ, मद , मोह , मत्सर , या विकारांच्या पापुद्रामागे लपुन जाते .
       जर आमच्यातून सुंदर मुर्ती साकारायची असेल , व्यक्तीमत्वाला सुबक आकार हवा असेल, तर विकारांचे पापुद्रे दुर सारायला हवेत . त्यासाठी छिन्नी हातोड्याचे घाव सोसण्याची तयारीही ठेवावीच लागेल .     

Tuesday 11 October 2011

मराठी बोधकथा रंग



  
     आम्ही जेव्हा लहान होतो. तेव्हा गल्लीमध्ये शरबत, बर्फाचे गोळे विकणारा गाडीवाला यायचा . त्याच्या गाडीला घंटा टांगलेली असायची . ती घंटा वाजवत वाजवत तो त्याची गाडी गल्लीमध्ये पुढे ढकलत न्यायचा . त्याच्या हातातल्या लोखंडी पट्टीने तो शरबताच्या बाटल्यावर प्रहार करायचा . कधी ती पट्टी त्या रंगीत बाटल्यावरुन फरकन खेचायचा . त्यामुळे निर्माण होणारा आवाज अजुनही कानात घुमतो आहे.
     आम्ही मुली त्याच्या त्या घंटीचा आणि बाटल्यांचा आवाज ऐकून त्याच्या गाडी भवती गोळा व्हायचो. सोबत आईकडून हट्ट करुन मागितलेले पाच दहा पैशाचे नाणे असायचे . रंगीत गोळा घेण्यासाठी मुलींची झुंबड उडायची .
      कुणी हिरवा गोळा मागत असे, कुणी निळ्या रंगाचा मागत असे तर कुणीही लाल रंगाचा बर्फाचा गोळा मागत असे . बरे हा प्रत्येक गोळा प्रथम पांढर्‍या रंगाच्या बर्फापासुनच बनायचा ! गाडीवाला हातात फिरवायच्या मशिने बर्फ किसून घ्यायचा मग मध्यभागी काडी ठेवून काचेच्या ग्लासात किसलेला बर्फ दाबला की झाला गोळा तयार . त्यावर तो बाटलीतील रंगीत शरबत शिंपडायचा . हे रंगीत शरबत साखरयुक्त असल्यामुळे गोळ्याला रंग आणि गोडवा प्राप्त व्हायचा . चव आणि गंध मात्र सर्व गोळाचा सारखाच. वस्तुतः कोणत्याही विशिष्ट रंगासाठी आग्रह  धरण्याचा काहीही कारण नव्हते . पण तरीही आम्ही  विशिष्ट रंगाच्या गोळ्याचा आग्रह धरायचो .
      आता मोठ झाल्यावर लहानपणीची ही कृती हास्यास्पद वाटते . पण आता तरी आम्ही खरोखरच मोठे झालो आहेत का ? स्वतःला विविध धर्माचे अनुयायी म्हणवणारे लोक, त्यांचे वागणे लहानमुलांच्या वागण्यापेक्षा भिन्न आहे का ? कुणी हिरव्या रंगाची पताका तर कुणी भगवा ध्वज तर कुणी निळ्या झेड्यासाठी आग्रह धरतो आहे . त्याला त्याने धार्मिक भावना असे गोडंस नाव दिले आहे परंतु हे सर्व रंग ज्या परमात्म्याशी संबंधीत आहे तो परमात्मा बर्फाच्या गोळ्यातील गोडव्याप्रमाणे सर्वत्र एकच आहे. याचा माणूस कधी विचार करणार आहे का ? 

मराठी बोधकथा विस्तार




     विश्वाच्या निर्मितीच्या अनेक सिध्दांतापैकी अत्यंत महत्त्वपुर्ण आणि मान्यता पावलेला सिध्दांत म्हणजे      महास्फोटाचा सिध्दांत अर्थात बिग बॅग थेअरी . निर्मितीच्या पुर्वी विश्व हे एका बिंदूमध्ये सागावले होते.  त्या बिंदुचा स्फोट झाला . त्यामधून द्रव्य बाहेर पडले. स्फोटामूळे हे द्रव्य एकदुसर्‍यापासुन दुर जावू लागले. दाही दिशांना हे द्रव्य पसरले . त्या द्रव्यापासून आकाशगंगा , तारे , ग्रह , उपग्रह , धुमकेतू , अशनी , या सर्वाची निर्मिती झाली. महास्फोटातुन निर्माण झालेले हे विश्व त्याच्या जन्मापासून आजपर्यंत प्रसरण पावत आहे. आकाशगंगा एकमेकांपासून दूर जात आहेत . प्रसरणशिलता हे या विश्वाचे व्यवछेदक लक्षण आहे. त्याचा विस्तार होण्यातच त्याचे अस्तित्व लपलेले आहे. एका अर्थाने या विस्तारानेच जिवन जन्माला घातले आहे. विस्तार म्हणजे जीवन आणि आकुंचन म्हणजे मृत्यु !
       झाडाची बी आम्ही जमीनीच पुरतो . तिला पाणी घालतो . बी ला कोबं फुटते, त्यापासून डेरेदार झाड तयार होते . तयार झालेले हे झाड त्या बिजाचाच विस्तार आहे . असा कोणी कल्पनाही करु शकनार नाही की इवल्याशा बिजामध्ये एवढा मोठा वृक्ष लपलेला असेल . परंतु जेव्हा ते बिज विस्तारीत होते, तेव्हा वृक्ष आकाराला येतो . जिवन जन्माला येते .
      मनुष्य प्राणी आणि इतर प्राणी हे बिजाचाच विस्तार आहेत . झाडाचे बी जमीनीत पेरले जाते आणि प्राण्यांच्या बिजाची जोपासना गर्भाशयात होते . गर्भाशयात बिजाचा विस्तार होतो आणि जीवन आकाराला येते .
      जीवनाच्या मुळाशी विस्तार असल्याचे सर्वत्रच दिसुन येते . परंतु विकास झाला म्हणणारी माणसे इतरांपासून तुटत जातात . नातेवाईक -  मित्र यांचा पसारा कमी होतो . आकुंचीत होतो . विस्ताराच्या विरुध्दची क्रिया सुरु होते . आणि जीवनाच्या मुळाशी तर विस्तार आहे . समाजापासून तुटणारी ही माणसे खरोखरच विकासाकडे जातात की विनाशाकडे  ?

Monday 10 October 2011

मराठी बोधकथा - रुमाल




        रुमाल हा शब्द मोठा मजेशिर आहे . लहाणपणी गावात रुमालमध्ये लोक सामान , भाजीपाला बांधून  नेत असल्याचे मी पाहिलेले आहे . त्यामुळे  रुमाल म्हणजे भाजीपाला बांधून नेण्यासाठी जवळ बाळगावयाचा चौकोनी कापड . असा लहानपणी माझा समज होता . अर्थात वाढत्या वयाबरोबर हा गैरसमज असल्याचेही लक्षात आले.
        दुपट्टा आणि रुमाल हे एकाच कुळातले , पण दुपट्टा आकाराने मोठा म्हणून तो रुमालाचा मोठा भाऊ ! तसेच शहरी भागात कुणी फारसा दुपट्टा वापरत नाही . शहरात रुमाल वापरतात आणि ग्रामिण भागात गळ्यात दुपट्टा टाकलेले लोक हमखास भेटतात . या अर्थाने दुपट्टा हा खेड्यात राहणारा तर रुमाल हा त्याचा शहरात राहणारा भाऊ !
       स्वातंत्र्याचे म्हणाल तर दुपट्टा अधिक स्वतंत्र आहे . तो गळ्यात छानपणे लोंबकाळत असतो. मस्तपैकी ताजी हवा खात असतो . पण रुमालाला फडकवण्याचे स्वातंत्र्य नाही. त्याची सदा घडी केलेली आणि खिशात कोंबलेली . स्वच्छ मोकळी हवा रुमालाच्या नशिबात नाही पण काही का असेना ! रुमाल आणि दुपट्टा हे दोघेही अत्यंत उपयुक्त हे मात्र तितकेच खरे . सर्दी झाली असेल , तर हे सत्य मान्य करायला मिनिटभर वेळ लागणार नाही .
     असेच एकदा एकटी  बसली होती . रुमाल काढला . त्याने चेहरा पुसला ! रुमालाकडे मी निरखून पाहीले एखाद्या परोपकारी व्यक्तीने दुसर्‍याचे कष्ट आपल्या अंगावर घ्यावे त्याप्रमाने रुमालाने माझा घाम टिपुन घेतला होता . गंमत म्हणुन मी त्या रुमालाला गाठी पाडायला सुरुवात केली . पहिली गाठ पाडली , मग दुसरी , मग तिसरी , अशा जेवढ्या गाठी येतील तेवढ्या गाठी मी त्या रुमालाला पाड्ल्या . आता तो रुमाल न दिसता गाठी पाडलेल्या एखाद्या दोरी सारखा दिसत होता . त्याच्या त्या रुपाकडे पाहून माझ्या मनात विचार आला , आता हा घाम पुसू शकेल काय ? अर्थातच त्या गाठिच्या रुमालाला घाम पुसणे शक्य नव्हते .
      मन आणखी पुढे विचार करू लागले . रुमाल हा आमचे व्यक्तिमत्त्व , वाईट सवई या गाठिसारखा ! त्या जडल्या की व्यक्तिची उपयुक्तता संपली .

Friday 7 October 2011

मराठी बोधकथा धार्मिकता


       वृक्षाचे महत्त्व सांगणारी अनेक सुभाषिते संस्कृत भाषेमध्ये आहेत . वृक्षवल्ली आम्हा सोयरे असे संत तुकारामांनी म्हटले आहे. अनेक कवींनी झाडे वेली यांच्यावर कविता केल्या आहेत.
     झाडे आहेतच तशी महत्त्वपुर्ण . झाडे आहेत म्हणुन जीवन आहेत . ज्या दिवशी झाडे संपतील त्या दिवशी पृथ्वीवरील जीवन संपलेलं असेल . मागे उरतील ओस पड्लेले मोठमोठे कारखाने !
      आमच्या संस्कृतीमध्ये झाडांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आदिवासींच्या गुफाचित्रामध्ये झाडे रेखाटलेली आढळतात . वारल्यांच्या चित्रामध्ये झाड हमखास असतात. झाडे आडनाव असणारी माणसे आमच्याकडेही आहेत . कंदब , आंबेवडे , पिंपळगावकर , वडगाव , पिंपळगाव अशी झाडांची नावे असणारी गावे ही हमखास सापडतात.
       आमच्या प्रत्येक धर्मामध्ये झाडांना महत्त्व आहे . मुस्लिम धर्म आणि खजुराचे झाडे यांचे नाते आहे. ख्रिश्चनांना ख्रिसमस ट्री प्राणप्रीय तर बौध्दांना बोधिवृक्ष पुजनीय वाटतो . वटसावित्रीला हिंदु महिला वडाच्या झाडाची पुजा करतात. सणप्रसंगी आब्यांची पानांचेच तोरण लावले जाते . तुळशीवृदांवन प्रत्येक हिंदुच्या घरी हमखास सापड्ते .  शिवाय उबंर , पिंपळ इ. झाडे देखिल हिंदु धर्मात पवित्र मानलेली आहेत.
        झाडाप्रमाणेच आम्ही माणसे प्रतिमेमध्ये ही देव पाहतो . परंतु प्रतिमा निर्जिव  असते व झाड जिवंत असते. निर्जिव असणार्‍या प्रतिमेची थोडी विटंबना झाली, तर त्या त्या धर्मियांच्या भावना उफ़ाळून येतात . लोक रस्त्यावर उतरतात. रास्ता रोको करतात . परंतु धर्मामध्ये महत्त्वपुर्ण स्थान असणारे जिवंत झाड कुणी तोडले तरी फारशी दखल घेत नाही . स्वतःला धार्मिक  म्हणवणारे आम्ही सर्वच धर्माचे लोक , आमच्या डोळ्यादेखत झाडांची कत्तल होतांना तरी आम्ही स्वस्थ बसून राहात असू , तर स्वतःला धार्मिक म्हणवण्याचा आम्हाला खरोखरच काही नैतीक अधिकार उरतो काय ?



Sunday 2 October 2011

मराठी बोधकथा कवच




   पृथ्वीवर विविध प्रकारचे हवामान आढळते . टुड्रां प्रदेश अतिशय थंड आहे, तेथे सदैव  बर्फ़ पसरलेला असतो. लोकांना अंगावर प्राण्यांची कातडी ओढून राहावे लागते. विषुवृत्तीय प्रदेशातील वातावरण उष्ण , भरपुर पडणारा पाऊस त्यामुळे दाट जंगले . मोठमोठ्या नद्याची सुपिक मैदाने तेथे लोकांची दाटीवाटीची वस्ती कारण मैदानी प्रदेशात शेतीला चांगला वाव जेथे नफ्याची शक्यता तेथे माणसाची धाव .
    सुपिक प्रदेशाप्रमाणेच पृथ्वीवर वाळवटें देखील आहेत . वाळवंटातील जीवन अतिशय अडसर तुटपूंजा रडणारा किंवा मुळीच न पडणारा पाऊस , त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य , शेती नाही आणि पशूपालना वरही मर्यादा आलेल्या . दिवसांचे भयंकर तापमान आणि रात्री शरीर गारठवून टाकणारी थंडी . तरी माणूस मोठा जिद्दी . हटकून काही जमाती वाळवंटी प्रदेशात राहतातच !
     वाळवंटी प्रदेशातील प्राणीही मोठे मजेशिर जाड कातडीचे . उटांला तर वाळवंटातील जहाज म्हणतात . याशिवाय सरडे , साप , विंचू , अशा प्राण्यांचा वाळवंटात भरणा. म्हणजे वाईटात आणि वाईट असेच म्हणावे लागेल .
      वाळवंटातील वनस्पती पण आपले खास वैशिष्ट्य जोपासणार्‍या . खुरट्या आकाराचा आणि काटेरी वाळवंटात साप ,विंचू , सरडे याच्या सोबतीला काटेरी वनस्पतीच का ? कारण स्पष्ट आहे . जसे तुम्ही असाल तसेच तुम्हाला मित्र ही लाभतील !
    वाळवंटातील काटेरी वनस्पतीचे काटे , फळे खाण्यार्‍या प्राण्यांपासून त्यांचे संरक्षण करतात . या झाडांना जर काटे नसते , तर ही झाडे प्राण्यांनी कधीचीच नष्ट करुन टाकली असती . काटे हे या झाडांचे संरक्षण कवच आहे . हज़ारो वर्षापासून हे कवच या वनस्पतींनी जपले आहे . वाळवंटातल्या वनस्पतीप्रमाने तरुणीनाही भय आहे, ते समाजातील काटेरी माणसाचे . ही काटेरी माणसे कधी ओरबाडतील याचा नेम नाही . अंगभर कपडे हे संरक्षण करणार्‍या कवचासारखे रक्षण करणारे . फारसे लक्ष आकर्षीत होवू  न देणारे . आता हे संरक्षण कवच फेकून देण्यासाठी फॅशनच्या नावाखाली स्पर्धा लागलेली आहे . आपल्या हिताचे आपल्यालाच भान नसावे ! यापेक्षा मोठे दुदैव काय असू शकेल ?