Tuesday 18 October 2011

मराठी बोधकथा घर पाहावे बांधून !



       घर पाहावे बांधून , लग्न पाहावे करुन अशी एक म्हण आहे . माणसांची ही म्हण कदाचीत पक्षांतही असावी . कारण पक्षी आपला जोडीदार निवडतात, संसार थाटतात, घर ही बांधतात , पिलांना जन्म देतात आणि संगोपनही करतात .
      माणसांच्या घर बांधण्याच्या तर्‍हा निरनिराळ्या आहेत . काही घरे शेणा मातीची, कुडाची , सारवलेली . काही दगडमातीची , कौलारु छ्प्पर असलेली . तर काहीवर टिनपत्र्याचे छप्पर . काही घरे पक्की विटा सिंमेंटाने बांधलेली आणि वर स्लॅब घातलेली . एका खोलीपासून ते शेकडो खोल्या असणारी माणसांची घरे आहेत . एक दिवस एका खोलीत राहायचे म्हटले तरी वर्षभर पुरतील एवढ्या खोल्या असणारी अवाढ्य घरे माणसांनी बांधून ठेवलेली आहेत .
       माणसांच्या घरबांधणीमध्ये गरजेला कमी महत्त्व असून, ऐपतीला जास्त महत्त्व आहे. ज्याची जेवढी मोठी ऎपत , जेवढा अधिक खर्च करण्याची तयारी , त्याने तेवढे मोठे घर बांधावे . पक्षी मात्र गरजेपेक्षा मोठे घर बांधत नाहीत . पक्षांमध्ये गरीब चिमणी श्रीमंत चिमणी असा भेद नाही . सर्व चिमण्यांची घरे सारखीच गरजेनुसार बांधलेली . उगीचच आहेत म्हणुन चिमणी अवाढ्य घर बांधत नाही .
      मुळामध्ये पक्षी स्वतःसाठी घर बांधत नाही . पक्षी घर बांधतात . आपल्या पिल्लासाठी . पिल्ले लहान असेपर्यंत घरट्यात राहतात . एकदा मोठी झाली की, आई वडिलांचे घरटे सोडून स्वतंत्र राहतात. आईवडीलांनी बांधलेली घराचा मोह त्यांना होत नाही.
       आम्ही माणसे घर बांधतो . ती स्वतःसाठी व मुलांसाठी बांधतो मुले मोठी होतात. आपल्या पायावर उभी राहतात . पण वडिलोपार्जित घराचा मोह मुलांना सुटत नाही . आई वडिलांकडे ते घरात हिस्सा मागतात . प्रसंगी डोके फ़ोडण्यापर्यंत मजल जाते . वडिलोपार्जित घरासाठी भांडणार्‍या या मुलांनी पक्षांपासुन काहीतरी धडा घ्यावा .

2 comments:

  1. पक्षी आणि माणसात आपण काहीच फरक करणार नाही का? प्रश्न फक्त घराचा असेल तर ठीक आहे, पण माणसाला इतरही प्रश्न आणि समस्या आहेत.भले मग ते माणसाने स्वतः निर्माण केलेले का असेनात! भाड्याच्या घरात राहणाऱ्या माणसाने स्वतःच्या घराचा विचारच करू नये का? प्रश्न गरजेचा असेल तर भाड्याच्या घराने त्याची गरज भागवलेली असते. मग त्याने बिऱ्हाड पाठीवर घेऊन ह्या घरातून त्या घरात फिरत रहावे का?

    ReplyDelete