Tuesday 11 October 2011

मराठी बोधकथा रंग



  
     आम्ही जेव्हा लहान होतो. तेव्हा गल्लीमध्ये शरबत, बर्फाचे गोळे विकणारा गाडीवाला यायचा . त्याच्या गाडीला घंटा टांगलेली असायची . ती घंटा वाजवत वाजवत तो त्याची गाडी गल्लीमध्ये पुढे ढकलत न्यायचा . त्याच्या हातातल्या लोखंडी पट्टीने तो शरबताच्या बाटल्यावर प्रहार करायचा . कधी ती पट्टी त्या रंगीत बाटल्यावरुन फरकन खेचायचा . त्यामुळे निर्माण होणारा आवाज अजुनही कानात घुमतो आहे.
     आम्ही मुली त्याच्या त्या घंटीचा आणि बाटल्यांचा आवाज ऐकून त्याच्या गाडी भवती गोळा व्हायचो. सोबत आईकडून हट्ट करुन मागितलेले पाच दहा पैशाचे नाणे असायचे . रंगीत गोळा घेण्यासाठी मुलींची झुंबड उडायची .
      कुणी हिरवा गोळा मागत असे, कुणी निळ्या रंगाचा मागत असे तर कुणीही लाल रंगाचा बर्फाचा गोळा मागत असे . बरे हा प्रत्येक गोळा प्रथम पांढर्‍या रंगाच्या बर्फापासुनच बनायचा ! गाडीवाला हातात फिरवायच्या मशिने बर्फ किसून घ्यायचा मग मध्यभागी काडी ठेवून काचेच्या ग्लासात किसलेला बर्फ दाबला की झाला गोळा तयार . त्यावर तो बाटलीतील रंगीत शरबत शिंपडायचा . हे रंगीत शरबत साखरयुक्त असल्यामुळे गोळ्याला रंग आणि गोडवा प्राप्त व्हायचा . चव आणि गंध मात्र सर्व गोळाचा सारखाच. वस्तुतः कोणत्याही विशिष्ट रंगासाठी आग्रह  धरण्याचा काहीही कारण नव्हते . पण तरीही आम्ही  विशिष्ट रंगाच्या गोळ्याचा आग्रह धरायचो .
      आता मोठ झाल्यावर लहानपणीची ही कृती हास्यास्पद वाटते . पण आता तरी आम्ही खरोखरच मोठे झालो आहेत का ? स्वतःला विविध धर्माचे अनुयायी म्हणवणारे लोक, त्यांचे वागणे लहानमुलांच्या वागण्यापेक्षा भिन्न आहे का ? कुणी हिरव्या रंगाची पताका तर कुणी भगवा ध्वज तर कुणी निळ्या झेड्यासाठी आग्रह धरतो आहे . त्याला त्याने धार्मिक भावना असे गोडंस नाव दिले आहे परंतु हे सर्व रंग ज्या परमात्म्याशी संबंधीत आहे तो परमात्मा बर्फाच्या गोळ्यातील गोडव्याप्रमाणे सर्वत्र एकच आहे. याचा माणूस कधी विचार करणार आहे का ? 

No comments:

Post a Comment