Sunday 14 August 2011

मराठी बोधकथा साबण



     साबण हा रोजच्या आम्हाला स्पर्श करणारा आणि खरे सांगायचे झाले तर, आम्ही ज्याला स्पर्श करतो असा विषय . साबण फ़ार पुर्वीपासुन अस्तित्वात असावे असे म्हणतात . सिंधू संस्कृतीतले लोक साबण वापरत असावे . असा विव्दवानाचा अंदाज आहे . सम्राट अकबराच्या काळात लोणारच्या तळ्यातल्या क्षारयुक्त पाण्यापासून साबण बनविणारी            साबणकरी   नावाची जमातच अस्तित्वात होती. मन नाही निर्मळ ! तया काय करील साबण !! असे संत तुकारामांनी म्हटले आहे. म्हणजे संतशिरोमनी ना ही साबण माहीत होता.
        आता साबणाचे विविध प्रकार अस्तित्वात आलेले आहेत. अंग धुण्याचे साबण . त्यातही लहान मुलांचे वेगळे , महिलांचे वेगळे . पुरुषांचे वेगळे . त्यातल्या त्यात कष्टकरी पुरुषांचे डेटॉल , लाईफबॉय सारखे आणखी वेगळे . डोके धुण्याचे शिकेकाई युक्त साबण , कपडे धुण्याचे साबण , इतकेच काय भांडी धुण्याची साबण आणि कुत्रे मांजरी यांना आंघोळ करण्याकरीता वापरावयाचेही साबण बाजारात उपलब्ध आहेत .
         उन्हाळ्याचे दिवस होते . सुर्य आकाशात तळपत होता. सुर्याचा उष्णतेने अंग होरपळून निघाले होते. त्यातच दुचाकी वरुन कच्च्या रस्त्यावरचा प्रवास घडला. घरी आल्यावर आंघोळ करण्याशिवाय दुसरा कोणताही विचार मनामध्ये आला नाही . साबणाच्या वाहत्या फेसाबरोबर अंगावर जमलेली सगळी धुळ वाहुन गेली. प्रसन्न वाटायला लागले .
      हातातल्या साबणाच्या वडीकडे पाहुण विचार आला की , साबणाच्या वडीचा संबंध नेहमी मळाशी , धुळाशी आणी घाणीशी . मळ आणी धुळ यांच्या संपर्कात येवुनही साबण स्वत:मात्र कधीच मळत नाही. मळ आणि धुळीचा नाश करणारा साबण स्वत:नेहमी स्वच्छ राहतो, हा साबण मला व्यसनमुक्तीचे काम करणार्‍या कार्यकर्त्यासारखा वाटतो तो व्यसनी लोकांच्या सातत्याने संपर्कात राह्तो, पण व्यसन मात्र त्याला चिकटू शकत नाही !



1 comment: