Monday 22 August 2011

मराठी बोधकथा निवड


    लहानपणी घरची बरीच कामे मी करायची ! नौकरी निमीत्याने आई वडील कामात व्यस्त असायचे . त्यामुळे घरी किराणा आणणे . बाजारातुन भाजी - पाला आणणे ही जबाबदारी माझीच !
     कुठलासा सण होता . आईला पुजेसाठी नारळ हवे होते . कालच घरातील पाण्याचा माठही फुटला होता. आईने मला बाजारात धाड्ले आणि नारळ व माठ आणायला सांगितले .
     सर्वप्रथम मी वाण्याकडे गेली. नारळ पाहिजे असे सांगीतले . वाण्याने दुकानाच्या दरवाज्याजवळ नारळाचे पोते ठेवले होते . त्या पोत्यामधुन नारळ निवडुन घ्यायला त्याने मला सांगितले. मी नारळाच्या पोत्यामधुन नारळ निवडू लागली . त्यांना वाजवून बघू लागली . एक नारळ चांगला खणखणित वाजला पैसे देवून तो नारळ मी विकत घेतला .
       मग मी कुंभाराकडे गेली . माठ पाहिजे असे त्याला सांगीतले, त्याने माठ दाखविले . तो माठ दाखवित होता . ते माठ मी हातातल्या अंगठीने वाजवून बघत होते. कच्या माठातून बसका आवाज निघत होता . पक्के माठ खणखणित आवाज करत होते , टणटण असा खणखणित आवाज करणारा माठ मी विकत घेतला . घराकडे परत निघाली .
     वाटेत चालतांना डोक्यात विचारचक्र फिरु लागले. नारळाची निवड केली ती वाजवून . खडखड वाजला तोच नारळ निवड्ला . मठाची निवड केली ती वाजवून . टणटण वाज़ला तोच माठ निवडला . वाजवण्यासाठी आघात करावा लागला . आघात हा संकटासारखा .
     आमच्यावर येणारी संकटे ही आघातासारखी ती आम्हाला वाजवून बघतात . आम्ही टणटण वाज़लो नाही म्हणजे आम्ही त्यांना उत्तर दिले नाही. आम्ही टणटण वाजणे म्हणजे आम्ही संकटाना खणखणीत उत्तर देणे .
     निसर्गाला आमची निवड करावयाची असते . संकटाचा आघात करुन निसर्ग आम्हाला वाजवून बघतो . आम्ही या आघाताला खणखणित उत्तर दिले तर आम्ही पक्के आहोत असे मानून निसर्ग आमचीच  निवड करतो .
    तेव्हा यापुढे संकटाचा आघात झाला तर आपल्याला निवडण्यासाठी निसर्ग आपल्याला वाजवून बघतोय असे समजायला हरकत नसावी. 

1 comment: