Wednesday 2 November 2011

मराठी बोधकथा गर्दी



   
         निवडणुका , नेते , आणि सभा हे अतुट समिकरण आहे . निवडणुका जवळ आल्या की प्रचाराची रणधुमाली सुरु होते . गल्लोगल्ली , खांबा खांबावर बॅनर , पोस्टर झळकु लागतात . भोंगे लावलेल्या गाड्या फिरु लागतात .
      
          निवडणूकीच्या प्रचाराच्या साधनामधील अत्यंत महत्वाचे साधन म्हणजे प्रचारसभा ! मतदार संघात मोठमोठ्या नेत्यांच्या प्रचारसभा पार पडल्या व या सभांना लाखोंच्या संख्येने लोक गोळा झाले की, विजय निश्चित झाला असे समजले जाते . सभेसाठी येणारा नेता जर लहान असेल तर हेलीकॉप्टरने येतो बर्‍याचदा जमलेली गर्दी हे नेत्यांचे भाषण ऐकण्यासाठी नव्हं तर उतरणारे आणि उडणारे हेलीकॉप्टर पाहण्यासाठी जमलेली असते .
      मोठ्या नेत्यांच्या सभेला मोठी गर्दी जमावी म्हणुन गावच्या स्थानिक नेत्यांना निरोप पाडले जातात . त्यांना ठराविक कार्यकर्ते आणण्याचे उद्दिष्ट दिले जाते. मग गावोगावचे हे स्थानिक नेते कार्यकर्ते गोळा करतात. आणि झेंडे लावलेल्या वाहनातून त्यांना सभास्थळी घेवून येतात. मुद्दाम आणलेल्या या लोकांची चहा पानाची , नास्त्याची व्यवस्था करावी लागते . प्रसंगी दिवसभराच्या मजुरीचे पैसे ही द्यावे लागतात . गर्दी जमविण्यासाठी किती हा खटाटीप ? आणि जमून जमून जमतात ती फक्त काही हजार माणसे !
      आषाडी, कार्तीकीला विठ्ठ्लाकडेही लोक जमतात .पण त्यांना कुणी सभेला जमण्याची सूचना दिलेली नसते . गाडी पाठविलेली नसते . चहापाणी आणि वाहनांची सोय केलेली नसते . मिळेल ते वाहन पकडून, प्रसंगी पायी चालत जावून भाविक पंढरीला पोहचतात . यामागची एकमेव प्रेरणा म्हणजे श्रद्धा   ! विठ्ठलावर ज्याप्रमाणे भाविकांची श्रद्धा आहे , तशी मतदाराची श्रद्धा नेत्यावर निर्माण झाली तर मग सभेला आपोआप गर्दी जमू लागते . शेवटी सारा श्रद्धचा खेळ !


No comments:

Post a Comment