Tuesday 22 November 2011

मराठी बोधकथा डोके टेकवणे




       सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मनुष्य हा झाडावर राहायचा . झाडावर त्याचा अधिवास होता .  झोपणे ही झाडावर होते . हळूहळू सुधारणा होत गेली . मानवाला जमिनीवर उतरावे लागले . आणि झाडावरचा मनुष्य जमिनीवर आला. त्यांनी गुहांचा आश्रय घेतला आणि रात्री झोपण्यासाठी तो गुहांमध्ये राहू लागला. कधी तरी या गुहामध्ये झोपणार्‍या सर्वच माणसाला असे जाणवले असेल की, गुहेमध्ये जो उंचावरचा दगड आहे . तिथे जर झोपलो तर जमिनीवर सरपटणारे प्राणी यांच्यापासुन संरक्षण होते. आणि मग उंचावर झोपणाच्या माणसाचा शोध लागला . या शोधातुन कधी तरी माणसाने लाकडाच्या ओडक्यापासुन पलंग सदृष्य वस्तु बनवली आणि त्यावर तो झोपायला लागला . हा पलंग आहे त्या पेक्षा मऊ बनविता येईल काय ?असा विचार करत या मानवाने पलंगाच्या लाकडी चौकटी कायम ठेवल्या आणि मधला पलंग विणुन काढला . या विणुन काढलेल्या पलंगाला आम्ही आज रोजी बाज असे संबोधतो .
         आजकाल शहरामध्ये लोखंडाचे पलंग आलेले आहे . त्यामुळे शहरी लोकांना बाज किंवा खाट हा काय प्रकार आहे याची जाणिव नसावी परंतु खेड्या पाड्यामध्ये अजूनही बाज पाहायला मिळते . खेड्यामध्ये बाज विनणारे काही अनुभवी लोक असतात . हे खास अनुभवी लोकच बाज विणु शकतात .बाज विणल्यावर तिच्यावर ताण यावा व त्यावरुन कोणी पडु नये म्हणुन पाय कसतात . अर्थात खालच्या बाजुला झोपणार्‍या व्यक्तीचे पाये येणार असतात . म्हणुन बाज पायाकडुन कसली जाते .
        लहानपणी खेड्यात माझ्या घरी बाज होती . त्या बाजेवर खेळतांना मला मजा वाटायची, मी त्यावर कधी उड्या मारायची . कधी डोक्याच्या आधारे उड्या मारायची आणि एक दिवस अचानक माझे डोके बाजेवर असणार्‍या लाकडाच्या माथ्यावर आदळले . त्या बाजेच्या माथ्याला ठावा असे म्हणतात . ठाव्यावर डोके आदळल्यानंतर डोक्याला चांगल टेगूंळ आलं आणि डोकं धरुन मी बसले . मी दोरीवर आपल डोकं टेकवत आहे असा विश्वास मनात ठेवून डोक ठेवल्यामुळे आणि ते चुकीच्या जागी टेकवल्यामुळे डोक्याला मार लागला होता . त्यामुळे पश्चातापाची पाळी  माझ्यावर आली होती .
        आज ह्या घटनेकडे विचार करतांना डोक्यामध्ये विचार येतो की , बाजेवर चुकीच्या ठिकाणी डोके ठेवले तर डोक्याला मार लागतो  व आपल्या वर पश्चातापाची पाळी येते . परंतु प्रत्यक्ष आयुष्य जगत असताना अनेकदा चुकीच्या ठिकाणी आम्ही डोके टेकवतो . चुकीच्या ठिकाणी डोके टेकवले आहे ही बाब लक्षात यायला तसा उशीरच होतो आणि जेव्हा लक्षात येते तेव्हा आमच्यावर पश्चातापाची पाळी आलेली अस्ते . आयुष्य जगत असतांना देवा धर्माच्या नावाखाली आम्ही बाबा बुवा याच्या पायावर डोक टेकवत जातो आणि हे लबाड बुवा आमचे शोषण करत जातात . जेव्हा आमच्या लक्षात येते की , आम्ही चुकीच्या ठिकाणी डोके टेकवीत आहोत तेव्हा बराच उशीर झालेला असतो . त्यामुळे या पुढे डोकं टेकवत असताना जरा सावध !  

No comments:

Post a Comment