Tuesday 22 November 2011

मराठी बोधकथा संयम



      आमच्या लहानपणी खेळणी फारशी उपलब्ध नव्हती . मग जे मिळालं त्या आधारे खेळायचो . नदीवरुन माती घेऊन यायचो . ती भिजवायचो आणि मग त्या मातीचे बैल बनवायचो , कधी कधी गणपतीही बनवायचो , कधी कधी तिच माती घ्यायची आणि त्याच मातीचा गणपती बनवायचा . सारे मुलं मुली मिळुन हा खेळ आम्ही खेळायचो . आता मात्र जग बदललेले आहे . बाजारामध्ये छान छान अशा स्वरुपाचे खेळ विकायला आलेले आहे .
       नुकतेच मी नागपुरला गेले होते . खेळोण्याच्या दुकानात गेले . माझ्या छोट्या मुलीसाठी मी प्लास्टर ऑफ़ पॅरीस पासुन बनलेला प्राणी बनवण्याचा खेळ विकत घेवून आले . त्या खेळामध्ये प्लास्टीकचे साचे असतात आणि त्या साच्यामध्ये प्लास्टर ऑफ़ पॅरीस ओतायच आणि मग त्याचा बैलाचा आकार असेल , तर बैलाची मुर्ती तयार होते . मग जर का तो घोड्याच्या आकाराचा असेल, तर घोड्याची मुर्ती तयार होते . मुलांना हा खेळ खुप आवडतो आणि मग आम्ही घरी हा खेळ आणल्यावर प्लास्टर ऑफ़ पॅरीस भिजवलं द्रावण तयार केलं आणि ते त्या साच्यामध्ये टाकलं आत साच्यामधुन प्राणी बाहेर पडल्यावर नेमका कसा दिसतो . याची उत्सुकता माझ्या लहानशा मुलीला लागलेली आणि ती सारखा आग्रह धरु लागली . आई ! आत मधली मुर्ती काढुन बघ ना !    आई ! आत मधली मुर्ती काढुन बघ ना ! आणि मग तिच्या आग्रहास्तव मला तो साचा हाती घ्यावा लागला .वस्तुतः त्या खेळावर दिलेल्या सुचनेनुसार किमान अर्धा तास तरी द्यायचा होता . म्हणजे साच्यामधलं ते द्रवण घट होणार होतं . परंतु जवळ जवळ दहा मिनिट कमी असतांना आम्ही साच्यामधला तो प्राणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये तो प्राणी तुटला . आम्हा दोघांचेही मन खट्टू झालं
       दुसरं असा प्रसंग मला आठवतो  की , काही दिवसापुर्वी माझ्या हातात थोडं खरचतलं रक्त बाहेर आलं आणि त्यावर मी मलम लावलं . एक दोन दिवसांनी ती जखम बरी झाली त्यावर एक काळ्या रंगाची खिपली चढली आणि ती मला सारखी खटकत होती .म्हणुन हाताच्या नखाने मी ती खिपली काढ्ण्याचा प्रयत्न केला परंतु जखम पुर्णपणे सुखली नव्हती आणि खिपली काढताच आतील रक्त पुंन्हा वाहायला लागलं . पुन्हा तिन चार दिवस ती जखम बसायला लागले आणि या वेळी मात्र खिपली आपोआप गळून पडण्याची वाट पाहावी लागली .
      त्या दोन्ही उदाहरणाकडे विश्लेषक नजरेने पाहत असतांना मला एक अणि एकच तत्व दिसतो . ते म्हणजे आयुष्यामध्ये संयम अतिशय महत्त्वाचा आहे. संयम बाळगला नाही आणि उतावीळपणे कृती केली तर पश्चाताप मनुष्याच्या वाटेला येतो . साच्यामध्ये टाकलेला प्लास्टर ऑफ़ पॅरीस जर पुर्ण वेळ राहु दिलं नाही , ते वाळू दिलं नाही , आणि लगेच बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तर प्राण्यांची मुर्ती सलग रुपात बाहेर न निघता तुटक किंवा फुटक्या रुपात बाहेर पडते . हाताला जखम झालेली त्यावरची खिपली जर पक्क न होऊ देता आम्ही काढण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा जखमच वाट्याला येते .
      या दोन्ही उदाहरणावरुन मला एवढाच बोध घ्यावासा वाटतो की, आयुष्य जगत असतांना संयम महत्वाचा हे लक्षात ठेवावं आणि संयम पाळत जगावं जेणे करुन अवेळी खिपली काढुन भळा भळा रक्त तुमच्या वाट्याला येणार नाही .


1 comment: