Tuesday 22 November 2011

मराठी बोधकथा कष्टाची किंमत



 
         शेती मला खुप आवडते . पावसाळा पडला शेतामध्ये होणारी ती पेरणी त्या तिफणमागे चालणार्‍या बाया , निंदन करतांना म्हटल्या जाणारी ती गाणी , शेतामध्ये बहरलेल आणि डोलणारं हिरवगार पिक , कणसामध्ये भरलेली दाणे आणि ती दाणे टिपुन घेण्यासाठी आलेले पक्षी , पक्ष्यांचा चिवचिवाट , पक्षी हाकलुन लावण्यासाठी शेतात लावलेले बूजगावणे या सर्व गोष्टी मनामध्ये पक्के घर करुन राहीलेले आहेत . धाण्याची कापणी आणि मग घरी भरुन आणलेली पोती , ते सर्व मन मोहरुन टाकणारं वाटतं . आता शेताशी फारसा संबंध येत नसला तरी , माझे आजोबा शेती करायचे . लहाणपणी आजोबाकडे गेलो की , शेतामध्ये जायची . आमचा हट्ट ठरलेला असायचा मग आम्ही सर्व बहिण भाऊ आजोबांच्या बैलगाडीमध्ये बसुन शेतामध्ये जायचो .
        एकदा असाच हट्ट धरुन आजोबा सोबत शेतामध्ये जायला निघालो . जरा सकाळी लवकरच निघालो होतो . आजोबांनी बैलगाडीला बैल जोतले . आम्ही बैलगाडी मध्ये बसलो . आजोबा बैलगाडी हाकलु लागले आणि बैलगाडी शेताच्या दिशेने धावू लागली . बैलगाडीच्या मागे मागे घरचा मोती कुत्रा देखील धावू लागला . आम्ही शेतामध्ये पोहचलो . बैलांनी ती बैलगाडी खेचुन शेतापर्यंत आणली होती आणि आजोबा सतत बैलानी चालाव म्हणुन त्यांना तुतारी टोचत होते .
       एकदाची बैलगाडी शेतामध्ये येवून पोहचली . आजोबांनी बैलगाडीचे बैल सोडले . थोडावेळ आम्ही शेतामध्ये बसलो . मुंगाच्या शेंगा तोडल्या . थोड्या भुईमुंगाच्या शेंगाही उपटून सोबत घेतल्या . मग शेतामध्ये कापून ठेवलेले गवताचे भारे आजोबांनी बैलासमोर ठेवले . बैलानी गवत आणि बैलागाडीत सोबत आणलेला थोडा कडबा खाल्ला . आम्ही सोबत शिदोरी आणली होती . आम्ही शिदोरी खाल्ली . मोती कुत्र्याला भाकर देण्यात आली . शेतामधील धाण्याची पोती आजोबांनी गाडी मध्ये टाकली आणि तोवर दुपार झालेली होती . आम्ही घराकडे परत येवू लागलो . उन्ह जरा जास्तच होत उन्हा तान्हामध्ये ते बैल आमचं आणि त्या पोत्याच वजन घेवुन धावत होते . आजोबा त्यांना हाकलत होते . आणि मोती कुत्र्याकडे बघीतले , तर बैलगाडीच्या खालून मोती कुत्रा चालात होता .
       हे सगळं दृष्य , हा सर्व घटनाक्रम आठवतांना वाटतं की , बैल आकाराने मोठा असतो . कष्टाळू असतो . परंतु त्याच्या वाट्याला काय तर ओझे आणि भार ! आणि त्या मध्ये कसुर केला तर मार ठेवलेला आणि ऐवढ करुन त्याला खायला काय तर गवत आणि कडबा . याच्या विरुध्द मोती कुत्रा काय करत होता ? तर गाडीच्या माग माग चालत होता . उन्ह वाढले म्हणुन बैलगाडीच्या सावलीत चालत होता आणि त्याला मात्र ज्वारी पासुन बनलेली भाकरी !
     वस्तुतः ज्वारी पिकवण्यामध्ये कुत्र्याचा कुठलाही वाटा नव्हता . खरा वाटा तर बैलाचा होता परंतु बैलाच्या वाट्याला आला होता तो कडबा आणि मोत्यानं काहीच केलं नव्हतं तरी त्याच्या वाट्याला आली त्या ज्वारी पासुन बनलेली भाकरी !
     मला असं वाटत की , आमची व्यवस्था ही असीच ! की , जो राबतो त्याच्या वाट्याला निकृष्ट जीवन . अगदी बैलासारखं ! आणि जो राबत नाही त्याला मोत्यासारखं जीवन ! मोत्यानं कार्यालयाच्या सावलीमध्ये बसुन काम करावे . सर्व सुख त्याच्या वाट्याला आणि अन्नदाता मात्र बैलासारखा शेतामध्ये राबणार .   याला न्याय म्हणावे काय ?          

No comments:

Post a Comment